तीच परिस्थिती, तेच वातावरण पुढच्या काळात महाराष्ट्रात राहावं, भास्कर जाधवांचं गणरायाला साकडं

रत्नागिरी: महाविकास आघाडी सरकारनं चांगलं केलं होतं, तीच परिस्थिती, तेच वातावरण पुढच्या काळात महाराष्ट्रात राहावं, शेतकऱ्यांवरचं संकट कमी व्हावं, असं साकडं शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी गणपती बाप्पाला घातलं आहे. भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावच्या घर गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षीही देखील भास्कर जाधव यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:37 AM • 31 Aug 2022

follow google news

रत्नागिरी: महाविकास आघाडी सरकारनं चांगलं केलं होतं, तीच परिस्थिती, तेच वातावरण पुढच्या काळात महाराष्ट्रात राहावं, शेतकऱ्यांवरचं संकट कमी व्हावं, असं साकडं शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी गणपती बाप्पाला घातलं आहे. भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावच्या घर गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षीही देखील भास्कर जाधव यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं आहे.

हे वाचलं का?

भास्कर जाधव काय म्हणाले?

याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, गेली अडीच वर्षे महाराष्ट्रात सर्व जाती धर्मांत, पक्ष पंथात सलोख्याचं वातावरण होतं. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शांत राहिला. सामाजिक सलोखा, धार्मिक आदरभाव टिकून राहिला, कोरोनाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने राज्याची आर्थिक घडी चांगली राखली. त्यामुळे तीच परिस्थिती, तेच वातावरण पुढच्या काळात महाराष्ट्रात राहावं, शेतकऱ्यांवरचं संकट कमी यावं, राज्याची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, अशी प्रार्थना गणरायाला केली असल्याचं भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय दिल्या शुभेच्छा?

महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचं आगमन घराघरात झालं आहे. दोन वर्षांपासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदाचा गणेश उत्सव निर्बंधमुक्त साजरा करूया. गणपती ही बुद्धिची देवता आहे. ही देवता आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान आणि आनंद घेऊन येवो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केलं.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले ”सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुयात आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी”, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.

    follow whatsapp