Mumbai Mahapalika Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील दादर-माहिम परिसरातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याची माहिती समोर आलीये. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) युतीअंतर्गत दादर-माहिम या भागातील सहा जागांपैकी चार जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असून दोन जागा मनसेकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादर-माहिममधील ठाकरे बंधूंचं राजकीय समीकरण अखेर समोर आलंय.
ADVERTISEMENT
दादर-माहिम परिसरातील जागावाटपाचा तिढा सुटला
ठाकरेंच्या युतीमधील चर्चेनुसार वॉर्ड क्रमांक 192 मनसेकडे तर वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे वॉर्ड क्रमांक 192 हा युतीच्या अंतिम चर्चेत मनसेला देण्यात आला असून त्या ठिकाणाहून मनसेचे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा हा पहिला उमेदवार ठरल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक 192 बाबत शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हा वॉर्ड आपल्यालाच मिळावा, अशी मागणी करत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी चार वाजता मातोश्रीवर भेट घेणार असल्याची माहिती आहे. माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हेही शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर येणार असून ते उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत. त्यामुळे जरी युतीत निर्णय झाला असला तरी स्थानिक पातळीवरील नाराजी आणि दबावामुळे पुढील काही तासांत राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत लढणार?
याचवेळी मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील होणार का, याबाबतही चर्चा वेग घेत आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती आहे. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील जागावाटप आणि संभाव्य युतीवर सविस्तर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला शरद पवार गटाला 10 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र चर्चेच्या पुढील टप्प्यात ही संख्या वाढवून १५ जागा देण्याची तयारीही दाखवण्यात आल्याचे कळते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 111 आणि 119 या दोन प्रभागांसह एकूण 16 जागांची मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपावरून अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसून चर्चा सुरूच आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एकीकडे ठाकरे गटाशी चर्चा सुरू ठेवत दुसरीकडे काँग्रेससोबतही संवाद सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत या चर्चांमधून नेमका कोणता राजकीय फॉर्म्युला बाहेर येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पवारांची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे अन् शिदेंची ऑफर, आता प्रशांत जगताप यांची पहिली प्रतिक्रिया समोर
ADVERTISEMENT











