पिंपरी-चिंचवड : पुण्याच्या शेजारी वेगाने विस्तारलेलं औद्योगिक आणि नागरी केंद्र म्हणून ओळख असलेलं पिंपरी-चिंचवड शहर हे केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या शहराचा कारभार पाहणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ही राज्यातील सर्वात प्रभावी महानगरपालिकांपैकी एक आहे. त्यामुळेच येथील महापालिका निवडणूक नेहमीच राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते.
ADVERTISEMENT
महापालिकेची स्थापना आणि शहराची जडणघडण
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. त्याआधी 1970 साली पिंपरी-चिंचवड नगरपरिषद अस्तित्वात आली होती. MIDC परिसर, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रातील मोठ्या उद्योगांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि स्वतंत्र महानगरपालिकेची गरज निर्माण झाली. पुढील काळात अनेक गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला आणि शहराचा विस्तार वेगाने वाढला. सुरुवातीला औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडने हळूहळू निवासी, आयटी आणि शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळख निर्माण केली. मात्र, या वेगवान विकासासोबतच पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, गृहनिर्माण आणि पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत गेले. या सगळ्याच आव्हानांचा भार महापालिकेवर येऊन पडला.
2017 ची महापालिका निवडणूक : भाजपची एकहाती सत्ता, राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात 2017 ची निवडणूक निर्णायक ठरली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) राजकीय समीकरणं बदलवत स्पष्ट बहुमत मिळवलं. एकूण 128 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने तब्बल 77 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. दीर्घकाळ शहरावर प्रभाव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेला 9 जागा मिळाल्या, तर मनसेला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, जो त्या पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला.
2017 मधील पक्षनिहाय जागा
भाजप : 77
राष्ट्रवादी काँग्रेस : 36
शिवसेना : 9
मनसे : 1
अपक्ष : 5
काँग्रेस : 0
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपचा वाढलेला मतवाटा आणि त्या मतांचं जागांमध्ये रूपांतर होणारा उच्च दर हे या विजयाचं प्रमुख कारण ठरलं.
गेल्यावेळी मतांची टक्केवारी कशी होती?
भाजप : 37.06%
राष्ट्रवादी काँग्रेस : 28.57%
शिवसेना : 16.60%
काँग्रेस : 3.11%
मनसे : 1.38%
अपक्ष : 8.57%
नोटा : 2.82%
भाजपचा सत्ताकाळ आणि विकासाचा दावा
भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडमध्ये पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. रस्ते विकास, जलवाहिन्या, स्मार्ट सिटी प्रकल्प, नदी सुधार योजना आणि प्रशासकीय पारदर्शकता हे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. मात्र, याच काळात विकासकामांच्या खर्चावर, नियोजनावर आणि प्राधान्यक्रमावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली.
महापालिकेची रचना आणि प्रशासक राजवट
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य सभेत एकूण 128 नगरसेवक असतात. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडले जातात. महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख आयुक्त (IAS अधिकारी) असतो. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक मानले जात असले, तरी प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे असतात. मार्च 2022 पासून महापालिकेत प्रशासक राजवट लागू आहे. त्यामुळे सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळत नसल्याची टीका होत आहे.
प्रभागरचना ‘जैसे थे’, आरक्षण जाहीर
आगामी निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच 32 प्रभाग आणि 128 नगरसेवकांची रचना कायम ठेवण्यात आली आहे. निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे—
महिला व पुरुष : प्रत्येकी 64
अनुसूचित जाती (SC) : 20
अनुसूचित जमाती (ST) : 3
ओबीसी : 35
सर्वसाधारण (खुला) : 70
सध्याची राजकीय स्थिती : अनेक शक्यता, अनेक समीकरणं
सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी मुख्य लढत दिसून येत आहे. भाजपची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली करत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यताही वर्तवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस कोणत्या आघाडीत जाणार, याकडेही लक्ष लागलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर
ADVERTISEMENT











