मुंबई महापालिका : मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना साथ देणार की काँग्रेसला? सर्वात मोठा सर्व्हे समोर

Mumbai Mahanagar Palika Election : सर्व्हेनुसार मुंबईतील मुस्लिम मतदारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंची संभाव्य युती, काँग्रेसची आघाडी आणि मविआतील फुट यामुळे मुस्लिम मतदार अजूनही ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत.

Mumbai Mahanagar Palika Election

Mumbai Mahanagar Palika Election

मुंबई तक

26 Dec 2025 (अपडेटेड: 26 Dec 2025, 09:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिका : मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना साथ देणार की काँग्रेसला?

point

असेंडिया कंपनीच्या नव्या सर्व्हेने राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai Mahanagar Palika Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांचा कल नेमका कुणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर असेंडिया कंपनीने केलेल्या ताज्या सर्व्हेमुळे अनेक महत्त्वाचे संकेत समोर आले आहेत. या सर्व्हेनुसार मुंबईतील मुस्लिम मतदारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंची संभाव्य युती, काँग्रेसची आघाडी आणि मविआतील फुट यामुळे मुस्लिम मतदार अजूनही ठाम निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत.

हे वाचलं का?

सर्व्हेमध्ये मुस्लिमबहुल वॉर्डांमध्ये मतदार नेमक्या कोणत्या निकषांवर मतदान करणार, याचा आढावा घेण्यात आला. त्यात केवळ 12 टक्के मतदारांनी ‘जो पक्ष वॉर्डमध्ये मुस्लिम उमेदवार देईल त्यालाच पाठिंबा देऊ’ असे मत व्यक्त केले आहे. तर केवळ 2 टक्के मतदारांनी भाजपचा पराभव करण्याची क्षमता असलेला उमेदवार हाच मुख्य निकष असल्याचे सांगितले. यावरून धार्मिक ओळखीपेक्षा स्थानिक राजकारण, उमेदवाराची प्रतिमा आणि जिंकण्याची क्षमता यांचा विचार मुस्लिम मतदार करत असल्याचे दिसून येते.

10 टक्के मुस्लीम मतदार ठाकरेंच्या बाजूने, तर 11 टक्के काँग्रेसच्या बाजूने - सर्व्हे

ठाकरे बंधूंची युती आणि काँग्रेस आघाडी यांच्यातील थेट तुलना केली असता, दोन्ही बाजूंना जवळपास समान प्रतिसाद मिळाल्याचे सर्व्हे सांगतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीला 10 टक्के मुस्लिम मतदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर काँग्रेस आघाडीला 11 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. मात्र, या दोन्ही पर्यायांपेक्षा सर्वात मोठा गट ‘सांगता येत नाही’ असा प्रतिसाद देणारा आहे. तब्बल 64 टक्के मुस्लिम मतदारांनी सध्या कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत स्पष्ट मत नसल्याचे सांगितले आहे.

हा आकडा मुस्लिम मतदारांमधील राजकीय संभ्रम अधोरेखित करणारा मानला जात आहे. सर्व्हेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 53 टक्के लोकांना ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस युतीबाबत स्पष्ट मत नसल्याचे समोर आले आहे. तसेच मविआमधील फुटीनंतर कोणत्या पक्षासोबत उभे राहावे, याबाबत 64 टक्के मतदार संभ्रमात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून मुस्लिम मतदार सध्या कोणत्याही एका राजकीय प्रवाहाशी पूर्णपणे जोडले गेलेले नाहीत, हे स्पष्ट होते.

असेंडिया कंपनीने मुंबईतील विविध भागांमध्ये हा सर्व्हे केला असून, त्यामध्ये शिवसेनेचे दोन गट, पक्षाची ओळख, स्थानिक नगरसेवकांची कामगिरी आणि विकासकामे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. अनेक मतदारांनी पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक पातळीवरील कामगिरी आणि उमेदवाराची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची असल्याचे संकेत दिले आहेत.

हा सर्व्हे अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. बृहन्मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. अरुणाचल प्रदेश, गोवा आणि त्रिपुरा या राज्यांचे एकत्रित वार्षिक बजेट जरी पाहिले तरी ते मुंबई महापालिकेच्या बजेटच्या जवळपासही पोहोचत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.

इतकेच नव्हे तर भूतान, फिजी, मालदिव आणि बार्बाडोस यांसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा बृहन्मुंबई महापालिकेचे बजेट मोठे आहे. त्यामुळे महापालिकेची सत्ता ज्याच्या हातात जाते, त्याच्याकडे मुंबईच्या आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय सूत्रांची मोठी ताकद एकवटते. याच कारणामुळे सर्वच प्रमुख पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पनवेल महापालिका निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने किती जागा जिंकल्या? किती होती शेकापची ताकद? इतिहास घ्या जाणून

    follow whatsapp