मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांच्या राजकीय मतांचा वेध घेणाऱ्या असेंडिया कंपनीच्या ताज्या सर्व्हेमध्ये शिवसेना UBT, मनसे आणि शिवसेना (शिंदे) या तीनही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा मुंबईकरांमध्ये प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तीन पक्षांनी एकत्र यावे अशी इच्छा सर्व्हेतील 52 टक्के मुंबईकरांनी व्यक्त केली आहे. या नव्या सर्व्हेने मुंबईच्या राजकीय वातावरणात नवे चर्चेचे वारे वाहू शकतात.
ADVERTISEMENT
असेंडिया कंपनीने मुंबईतील विविध भागांतील नागरिकांशी केलेल्या या सर्व्हेमध्ये शिवसेनेचे दोन गट, पक्षाची ओळख आणि स्थानिक प्रतिनिधींच्या कामगिरी भर देण्यात आला. BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे महत्त्वपूर्ण मानला जात आहे, कारण मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, येथील सत्ता कोणाच्या हाती जाईल यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरू शकते.
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी अनेकांची इच्छा
सर्व्हेतील मुख्य प्रश्न होता: "मूळ शिवसेनेतून तयार झालेले आजचे तीन पक्ष म्हणजे शिवसेना UBT, मनसे आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र यावे का?" यावर मुंबईकरांनी दिलेली उत्तरे अशी आहेत:
- होय: 52 टक्के
- नाही: 22 टक्के
- तटस्थ: 25 टक्के
- सांगता येत नाही: 1 टक्के
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मुंबईकर शिवसेनेच्या एकसंध स्वरूपाची अपेक्षा करत आहेत. शिवसेनेची मूळ ओळख बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील एकजुटीशी जोडलेली आहे, आणि सध्याच्या गटबाजीमुळे पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये अस्वस्थता आहे. सर्व्हेतील 52 टक्के लोकांच्या मताने हे दाखवते की, एकीकरण झाल्यास पक्षाची ताकद वाढू शकते आणि BMC निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो.
-
'खरी' शिवसेना कोणती?
सर्व्हेमध्ये एक प्रश्ना असाही विचारण्यात आला की, सध्या खरी शिवसेना कोणाची? पाहा यावर सर्व्हेमध्ये नेमकं उत्तर काय देण्यात आलं.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हीच 'खरी' शिवसेना असल्याचं मत 44 टक्के लोकांनी दिलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असल्याचं मत 22 टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे.
मात्र, 24 टक्के लोकांना 'खरी' शिवसेना कोणती हे सांगता आले नाही, ज्यामुळे खऱ्या शिवसेनेच्या ओळखीची लढाई अद्याप संपलेली नसल्याचे दिसते.
सर्व्हेवरून तूर्तास असं दिसतंय की, शिवसेनेवरील विश्वास अजूनही मजबूत आहे, पण गटबाजीमुळे मतदार विभाजित झाले आहेत.
मुंबईकरांनी दिलं नगरसेवकांच्या कामगिरीला प्राधान्य
सर्व्हेच्या दुसऱ्या भागात 'ओळखीचे महत्त्व' यावर भर देण्यात आला. मुंबईकरांच्या मते:
- स्थानिक प्रतिनिधी (नगरसेवक) यांच्या कामगिरीला सर्वोच्च प्राधान्य (52 टक्के).
- या गटातील लोक स्थानिक प्रतिनिधींशी सर्वाधिक जागरूक आणि गुंतलेले असतात.
हे दर्शवते की, BMC निवडणुकीत पक्षाची ओळख महत्त्वाची असली तरी, नगरसेवकांची प्रत्यक्ष कामगिरी मतदारांना अधिक प्रभावित करते. मुंबईतील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामे यासारख्या मुद्द्यांवर नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरू शकते. असेंडिया कंपनीच्या या सर्व्हेमुळे राजकीय पक्षांना मतदारांच्या अपेक्षा समजण्यास मदत होईल.
राजकीय विश्लेषण
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा सर्व्हे शिवसेनेच्या गटांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (UBT) ने कालच मनसेसोबत युती केली आहे. तर शिंदे गटाने भाजपसोबत युतीची चर्चा सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, या सर्व्हेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
ADVERTISEMENT











