मुंबई: महाराष्ट्रातील महायुती आघाडीतील शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेले शीतयुद्ध आता संपुष्टात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. आज निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असून, या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीमुळे महायुतीतील अंतर्गत कलह कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, ज्याचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवर होऊ शकतो.
ADVERTISEMENT
निलेश राणे यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर या भेटीचा फोटो शेअर करत लिहिले, "आज भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भेट घेतली."
मागील कलहाची पार्श्वभूमी
मागील काही महिन्यांपासून, विशेषतः नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांदरम्यान, निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले होते. सिंधुदुर्गातील मालवण, कणकवली यासारख्या ठिकाणी महायुती आघाडीचे युतीधर्म पाळले गेले नाहीत, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला होता.
निलेश राणे यांनी त्या निवडणुकीत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकून लाखो रुपयांची रोकड असल्याचे सर्वांना दाखवून दिलं होतं. राणे यांचा आरोप होता की, भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केले जात होते
या घटनेनंतर राणे त्यांनी चव्हाणांवर वारंवार टीका केलेली, ज्यात ते म्हणाले होते, "चव्हाण हे फक्त काही जिल्ह्यांचे प्रदेशाध्यक्ष वाटतात."
राणे बंधूंचा अंतर्गत संघर्ष: या कलहात निलेश राणे यांचे भाऊ आणि भाजप आमदार नितेश राणे यांचाही समावेश होता. कणकवली नगर परिषद निवडणुकीत दोन्ही भावंडांच्या पॅनेल्समध्ये थेट स्पर्धा झाली. नितेश राणे यांच्या नेतृत्वातील भाजप पॅनेलचा पराभव झाला, तर निलेश यांच्या शिवसेनेची सरशी झाली.
महायुतीतील तणाव: या घटनांमुळे महायुती आघाडीतील तणाव वाढला होता. निलेश राणे यांनी चव्हाणांना थेट जबाबदार धरले.
नागपूर अधिवेशनातील पहिली दिलजमाई
डिसेंबरच्या सुरुवातीला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दोन्ही नेत्यांची प्रथमच दिलजमाई झाली होती. विधानभवन परिसरात ते समोरासमोर आले असता, त्यांनी एकमेकांना मिठी मारली होती. निलेश राणे तेव्हा म्हणालेले की, "रविंद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हते. माझा लढा व्यक्तीविरोधात नव्हता, तर व्यवस्थेविरोधात होता."
चव्हाण यांनीही या भेटीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला. या घटनेनंतर महायुतीतील नेते म्हणाले की, निवडणुकीतील मतभेद केवळ तात्पुरते होते.
आजची भेट आणि प्रतिक्रिया
दरम्यान, आजच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राणे-चव्हाण यांच्या या भेटीमुळे कोकणातील राजकीय वातावरण शांत होण्याची शक्यता आहे. मात्र, कार्यकर्त्यांमधील असंतोष कायम राहिला तर आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. सध्या तरी महायुतीच्या नेत्यांनी एकजुटीचा संदेश दिला आहे.
ADVERTISEMENT











