नाशिक महानगरपालिका : 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता, मनसेचा झालेला सुपडा साफ; आता कोण मारणार बाजी?

Nashik Mahanagar Palika Election 2026 : 2017 मधील नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 122 जागांसाठी मतदान झालं होतं. यावेळी पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती.

Nashik Mahanagar Palika Election 2026

Nashik Mahanagar Palika Election 2026

मुंबई तक

26 Dec 2025 (अपडेटेड: 26 Dec 2025, 04:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक महानगरपालिका : 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता,

point

मनसेचा झालेला सुपडा साफ; आता कोण मारणार बाजी?

Nashik Mahanagar Palika Election 2026, नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं राजकीय केंद्र असलेली नाशिक महानगरपालिका ही नेहमीच राज्याच्या राजकारणात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. 2017 साली झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं होतं. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत एकहाती सत्ता मिळवली होती, तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला होता.

हे वाचलं का?

2017 ची निवडणूक : भाजपची एकहाती सत्ती आणि मनसेचा सुपडा साफ

2017 मधील नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 122 जागांसाठी मतदान झालं होतं. यावेळी पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. एकूण 31 प्रभागांमधून नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये 29 प्रभाग चार सदस्यीय, तर दोन प्रभाग तीन सदस्यीय होते. या निवडणुकीत भाजपने 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आणि नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता स्थापन केली. शिवसेना 34 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 6 जागांवर समाधान मानावं लागलं.

विशेष म्हणजे, 2012 च्या निवडणुकीत 39 जागा मिळवून सत्तेत सहभागी असलेल्या मनसेला 2017 मध्ये मोठा पराभव पत्करावा लागला. मनसेला केवळ 5 जागा मिळाल्या आणि पक्ष थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. प्रचारसभांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतपेटीत मिळालेला कौल यामधील फरक नाशिकमध्ये प्रकर्षाने दिसून आला.

2017 मधील पक्षनिहाय मिळालेल्या जागा

भाजप : 67

शिवसेना : 34

काँग्रेस : 6

राष्ट्रवादी काँग्रेस : 6

मनसे : 5

इतर : 5

भाजपचा महापौर, नाशिकवर सत्ता कायम

भाजपच्या या घवघवीत विजयामुळे नाशिक महापालिकेवर पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली. 2017 साली भाजपचे सतीश कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतली. भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे सत्तास्थापनेसाठी कोणत्याही युतीची गरज भासली नव्हती.

प्रभागरचना आणि नगरसेवकांची संख्या

नाशिक महानगरपालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक 31 प्रभागांमधून निवडून येतात. सध्याच्या प्रभागरचनेनुसार—

चार सदस्यीय प्रभाग : 29

तीन सदस्यीय प्रभाग : 2

पाच सदस्यीय प्रभाग : 0

एकूण प्रभाग : 31

ही प्रभागरचना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे.

आरक्षण : महिलांसाठी 50 टक्के जागांवर आरक्षण

नाशिक महापालिकेतील आरक्षण सोडतीनुसार यंदा महिलांना मोठी संधी मिळणार आहे. एकूण 122 पैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे—

सर्वसाधारण : 63

ओबीसी : 32

अनुसूचित जाती : 18

अनुसूचित जमाती : 9

महिला आरक्षण : 61

अनुसूचित जातीसाठी 18 जागा आरक्षित असून त्यापैकी 9 महिला उमेदवारांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी 9 जागा असून त्यातील 5 महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 32 जागा असून 16 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

यंदाची निवडणूक : भाजपसमोर सत्ता टिकवण्याचं, तर मनसेसमोर अस्तित्वाचं आव्हान

2017 मध्ये मिळालेल्या एकहाती सत्तेनंतर भाजपसमोर यंदा नाशिकमध्ये आपलं वर्चस्व टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. दुसरीकडे, इतर सर्व पक्ष सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळणार आहेत. मात्र सर्वाधिक लक्ष मनसेकडे लागून राहिलं आहे. 2017 मधील पराभवानंतर मनसे नाशिकमध्ये पुन्हा उभारी घेते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय समीकरणं बदललेली असताना, नाशिककर यावेळी कोणाच्या पारड्यात सत्ता टाकणार, हे आगामी महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर

 

    follow whatsapp