‘मग घ्या ना धौतीयोग!’ म्हणत सामनातल्या अग्रलेखानंतर शेलारांचा उद्धव ठाकरेंना ‘डोस’

मुंबई तक

28 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:48 AM)

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना रोजच रंगताना दिसतो आहे. एकीकडे अजित पवार हे सरकारला टार्गेट करत असतात. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हेदेखील सरकारविरोधात ताशेरे झाडत असतात. राज्यातली शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असाही सामना रंगतो. सामनाच्या अग्रलेखातूनही […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना रोजच रंगताना दिसतो आहे. एकीकडे अजित पवार हे सरकारला टार्गेट करत असतात. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हेदेखील सरकारविरोधात ताशेरे झाडत असतात. राज्यातली शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असाही सामना रंगतो. सामनाच्या अग्रलेखातूनही टीकेची झोड उठवली जाते. अशातच भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या सामनातल्या टीकेला खास पत्राने उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

सामनातल्या अग्रलेखातून भाजपच्या मराठी दांडियावर टीकास्त्र

लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही.

लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले. असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं आहे.

आशिष शेलार यांनी काय दिलं उत्तर?

मग घ्या ना धौतीयोग असा मथळा देत हे पत्र आशिष शेलार यांनी लिहिलं आहे. त्यात आशिष शेलार म्हणतात, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केलं, ज्यांनी दहीहंडी, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होते आहे. मुरड मारते आहे म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एक सल्ला मग घ्या ना धौती योग! असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

करून दाखवलेचे होर्डिंग लावले नाहीत

आशिष शेलार पुढे म्हणतात, भाजप दरवर्षीच दहीहंडी, गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव साजरा करत आहे. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख दुःखात सहभागी होत असतो. त्याचं कधीही राजकारण केलं नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा संकटात भाजपचे नेते, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत. घरोघरी जाऊन मदत करत होते. आमच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आहे. त्यामुळे आम्ही जे केलं त्याचं करून दाखवले चे बॅनर कधीच लावले नाहीत.

याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच

आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे थापाही राहिला नाही.. तसंच उत्सवही राहिले नाहीत. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतली आकडेवारी देऊन गर्वहरण केलं. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. गिरणगावात म्हणजेच लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपने आयोजित केला त्याचा त्रास सामनाकारांना आणि पेंग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच.

अहंकार, गर्वहरण करणाऱ्या दुर्गेचा, शारदेचा, अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होते आहे, राजकीय क्लेश करून तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते तुझ्या चरणी एकच प्रार्थना

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशांपासून सोडवी, तोडवी भवपाशा असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीकेचे बाण चालवले आहेत.

    follow whatsapp