Jejuri Bhandara Fire News : नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरात आनंदाचे वातावरण होते. विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी परंपरेनुसार गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडारा अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र हा आनंदाचा क्षण काही सेकंदांतच भीषण दुर्घटनेत बदलला. भंडारा अर्पण करत असतानाच अचानक मोठा भडका उडाल्याने सुमारे 16 जण गंभीररीत्या होरपळले.
ADVERTISEMENT
ही घटना दुपारी सुमारे तीनच्या सुमारास घडली. भंडाऱ्याला अचानक आग लागून त्याचा स्फोट झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांना काही कळण्याच्या आतच आगीची झळ अनेकांना बसली. या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे तसेच नगरसेविका स्वरूपा खोमणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते जखमी झाले.
घटनेनंतर तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तत्काळ जेजुरीतील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींना गंभीर भाजल्यामुळे पुढील उपचारांसाठी पुण्याकडे हलवण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा : बार्शी : नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय, दिलीप सोपलांना मोठा धक्का
प्राथमिक तपासात हा भडका ज्वलनशील आणि भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे उडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भंडाऱ्यातील रासायनिक घटकांमुळे तो सहज पेट घेतो, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. नेहमीप्रमाणे श्रद्धा आणि उत्साहात अर्पण करण्यात आलेल्या भंडाऱ्याने इतका मोठा अपघात घडवेल, याची कोणालाच कल्पना नव्हती.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री खुलेआम सुरू असल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी भेसळयुक्त आणि ज्वलनशील भंडाऱ्याची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. विजयाचा आनंद साजरा करताना घडलेली ही दुर्दैवी घटना जेजुरीकरांसाठी धक्का देणारी ठरली असून, श्रद्धास्थळी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











