बार्शी : नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय, दिलीप सोपलांना मोठा धक्का
Barshi Nagarpalika Election Results : सोपलांचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 4600 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बार्शी : नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय
दिलीप सोपलांना मोठा धक्का
Barshi Nagarpalika Election Results : नगरपालिका निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी चार ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे बार्शी नगरपालिकेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत यश मिळवलंय. बार्शी नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्याकडून तेजस्विनी कथले यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात आमदार दिलीप सोपल यांनी निर्मला बारबोले यांना मैदानात उतरवलं होतं. या निवडणुकीत तेजस्विनी कथले यांनी 4 हजार 600 मतांनी विजय मिळवला. याशिवाय राजेंद्र राऊत यांच्या गटाचे 23 नगरसेवक निवडून आले आहेत, तर सोपल गटाने 19 नगरसेवक निवडून आणत तगडी फाईट दिली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोपल गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : संजयकाका पाटलांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला, रोहित पाटलांच्या गटाचा तासगाव नगरपालिकेत पराभव
क्रॉस वोटिंगचा बारबोलेंना फटका
बार्शीत अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग पाहायला मिळालं. अनेक नागरिकांनी नगरसेवकपदासाठी सोपल गटाला मतदान केलं. मात्र, नगराध्यक्षपदासाठी तेजस्विनी कथले यांना पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोपलांचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 4600 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांची स्टॅटेजी यशस्वी झाल्याची चर्चा आहे. राजेंद्र राऊत यांची उमेदवार निवडण्याची खास पद्धत या निवडणुकीतही चर्चेचा विषय बनली आहे.
विशेष म्हणजे याआधी बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीतही भाजपने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. नगरपालिकेच्या या निकालामुळे बार्शीच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.










