मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या NIA ने माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आज (गुरुवारी) अटक केली आहे. मनसुख यांच्या हत्येचं प्लानिंग आणि आरोपींना सर्व मदत शर्मांनी पुरवल्याचा NIA ला संशय आहे. प्रदीप शर्मा हे शिवसेनेशी संबंधित असल्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात विरोधकांनी सेनेला धारेवर धरलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत या सर्व गोष्टींमागचे खरे गॉडफादर हे उद्धव ठाकरेच असल्याचं म्हटलंय.
ADVERTISEMENT
Pradeep Sharma: मोठी बातमी… एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक
मनसुख हिरेन आणि अँटेलिया प्रकरणात अटकेत असलेल्या किंवा चौकशी सुरु असलेले सर्व शिवसेनेशी संबंधित आहेत हे कसं काय? हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. आपण सर्वजण विचार करत आहोत की यामागचा खरा सूत्रधार कोण असेल? याचे खरे सूत्रधार उद्धव ठाकरेच आहेत असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.
मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक मिळववेल्या प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. दरम्यान या प्रकरणात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या पार्टनरच्या ओळखीतून हिरेन यांच्या हत्येसाठी गाडी पुरवण्यात आल्याचाही आरोप केला आहे.
दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. वाझेंच्या पाठीमागे शर्मांचा ब्रेन होता हे सर्वश्रुत होतं. अँटेलिया आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणातील अनेक बाबी प्रदीप शर्मा यांच्या अडचणीतून समोर येतील असं दरेकर म्हणाले.
दरम्यान या प्रकरणात NIA ने आतापर्यंत सचिन वाझे, रियाज काझी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याव्यतिरीक्त महाराष्ट्र एटीएसनेही याआधी मनसुख हत्येचा तपास करताना माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदेला अटक केली होती. विनायक शिंदे हा लखनभय्या बनावट चकमक प्रकरणातला आरोपी असून तो पॅरोलवर बाहेर आला होता. याच लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांवरही कारवाई झाली होती. NIA ने दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी नियोजन करण्यात प्रदीप शर्मांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून आता कोणत्या नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
