“महाविकास आघाडीतून बाहेर पडावं यासाठी मी..” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई तक

20 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

महाविकास आघाडीतून बाहेर पडावं हे उद्धव ठाकरे यांना पाचवेळा सांगितलं होतं. मात्र माझं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही. २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून लढवली होती. त्यावेळी शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावले नव्हते असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. जळगावमधल्या पाळधी या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण […]

Mumbaitak
follow google news

महाविकास आघाडीतून बाहेर पडावं हे उद्धव ठाकरे यांना पाचवेळा सांगितलं होतं. मात्र माझं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही. २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून लढवली होती. त्यावेळी शरद पवार आणि सोनिया गांधींचे फोटो लावले नव्हते असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. जळगावमधल्या पाळधी या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी?

भाजप आणि शिवसेनेचं जे सरकार आलं आहे. त्यांना लोकांनी स्वीकारलं आहे. आमच्यावर टीका केली जाते आहे मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ. आम्ही आल्यानंतर कुणी लोक काय काय करत आहेत.. कुठे गोमूत्र शिंपडत आहेत. आम्ही त्यांनाही कामातूनच उत्तर देऊ. त्यांच्याकडे गोमूत्र शिंपडण्याचंच काम उरेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

२०२४ च्या निवडणुकीत २०० आमदार निवडून येतील

२०२४ च्या निवडणुकीत २०० च्या पुढे आमदार भाजप आणि आम्ही निवडून आणू. बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे न्यायचा, धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार पुढे न्यायचा म्हणून आम्ही हे पाऊल उचललं आहे. ग्रामपंचायत निकालांमध्येही आपल्याला चांगला कौल जनतेने दिला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्ही जर भाजपसोबत गेलो तर लोकांना त्रास का होतो? ज्यांनी असंगाशी संग केला तेव्हा काही वाटलं नाही का? असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

आमच्या युतीला जनतेने स्वीकारलं आहे. निवडणुकीला मतं मिळतील म्हणून आम्ही वाट बघत नाही. आम्ही कामं करतो आम्ही मतं मिळावीत म्हणून कामं रखडवत नाही असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळे सोबत आहात. आम्ही जे ५० लोकांनी केलंय त्याची दखल संपूर्ण देशाने घेतली आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला जनतेने संधी दिली आहे. तसंच लोकांचं प्रेम आम्हाला मिळतं आहे. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना भाजप युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही देतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.

गुलाबरावांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेली, त्यांचे पाय ओढण्याचं काम कुणी केलं सगळ्यांना माहित आहे. पानटपरीवाला म्हणून गुलाबरावांना हिणवलं गेलं. त्यांना काय कुणालाच हिणवलं जाऊ नये. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसानेच मुख्यमंत्री बनायचं असा कुठे नियम आहे का? आज माझ्या रूपाने तुमच्या समोर शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे जो मुख्यमंत्री झाला आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

    follow whatsapp