कठोर निर्णय घ्यावा लागेल, CMनी बोलवली तातडीची बैठक : अजित पवार

मुंबई तक

• 07:57 AM • 18 Feb 2021

मुंबई: अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य खात्याचे सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्याची […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तीन शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य खात्याचे सचिव आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देखील या बैठकीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं आढळून आल्याने या तीनही शहरांबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी तातडीची बैठक बोलावली आहे. याच बैठकीला जाण्यापूर्वी अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना असं म्हटलं आहे की, ‘मुंबईपेक्षा अधिक प्रमाणात या तीनही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे याबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो.’ यामुळे आता या तीनही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ही बातमी अवश्य पाहा: ‘रुग्ण वाढतायेत, कठोर कारवाई करा’; अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

‘अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यातही अमरावतीमध्ये कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. येथे कुटुंबच्या कुटुंब पॉझिटव्ह सापडलं आहे. त्यानंतर मी याबाबत संपूर्ण माहिती घेतली आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यामुळे याविषयी मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलवली आहे. तसेच या बैठकीला आरोग्य खात्याच्या सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांना देखील बैठकीला बोलावलं आहे. यावेळी फक्त या तीन शहरांबाबत निर्णय घ्यायचा की, यामध्ये ग्रामीण भागाचा देखील विचार करुन लॉकडाऊन सारखा निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा केली जाईल.’

‘दरम्यान, आमच्या काही अधिकाऱ्यांनी आज तीनही शहरांचा आढावा घेतला. यावेळी त्यांना अत्यंत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. या शहरांमधील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असून येथे कुणीही मास्क वापरत नसल्याचं दिसतं आहे. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या ही वाढत आहे. म्हणून आता या सगळ्या गोष्टींचा विचार करता अत्यंत कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय काय असेल हे आपल्याला समजेल.’

‘सध्या या भागात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे पार पडत आहे. मला सांग की लग्न कार्य महत्त्वाची आहे की, माणसं वाचणं गरजेचं आहे? आधी लॉकडाऊनमध्ये नवरा-नवरी आणि मोजकीचं माणसं अशी लग्न झाली आहेत. त्यामुळे सध्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला काळजी घेतलीच पाहिजे. खरं तर सुरुवातीला कोरोनाबाबत गांभीर्य होतं. पण नंतर लोक बेफिकीर झाले.’

‘आजच्या घडीला मुंबईसारख्या शहरात जेवढी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नाही त्यापेक्षा जास्त अमरावतीची आहे. मी याबाबत मागील काही दिवसांपासून बोलत होतो की, कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊन देऊ नका. मुख्यमंत्री देखील याबाबत सातत्याने सांगत होते. त्यामुळेच कालच मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्तांची बैठक देखील व्हीसीच्या माध्यमातून घेतली होती. ज्याला मी देखील हजर होते. मधल्या काही महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लोकांना असं वाटतंय की, त्यांनी पूर्वीसारखं वागलं तरी काही हरकत नाही. पण असं अजिबात नाही. जर आपल्याला जर रुग्ण वाढू द्यायचे नसतील तर यासाठी खबरदारी ही घ्यावीच लागेल.’ असं अजित पवार म्हणाले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन काही कठोर निर्णय घेऊ शकतं.

    follow whatsapp