दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: राज्यातील गृहखातं शिवसेनेकडं यावं, अशी शिवसैनिकांची मागणी आणि अपेक्षा आहे. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये नव्यानं कुरबुर सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामध्ये ‘वर्षा’वर चर्चाही झाली. पण मी माझ्या सहकाऱ्यांच्या कामावर समाधानी आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (1 मार्च) कोल्हापुरात भाष्य केलं.
ADVERTISEMENT
‘राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नका, तो पक्ष खाण्यात मास्टर आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते प्रसंगी ‘मातोश्री’वर सुध्दा कॅमेरे लावतील.’ असं आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी आपला सल्ला ऐकला नाही.’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरून वाद सुरू आहे. भाजपच्या नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं, राष्ट्रवादीकडील गृहखातं शिवसेनेकडं यावं, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. त्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली.
गृहखाते शिवसेनेनं आपल्याकडंच ठेवावं, असा सल्ला आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला होता. मात्र त्यांनी तो ऐकला नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी हाणला.
दिलीप वळसे-पाटील हे माणूस म्हणून चांगले आहेत, पण ते गृहमंत्री पदाला न्याय देवू शकत नाहीत. तर संजय राऊत हे उध्दवजींचे कमी आणि पवारांचे जास्त आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वार्थी पक्ष असून, त्यांच्याकडंच महाविकास आघाडीचा रिमोट आहे. तर सतेज पाटील जाणीव नसलेल्या नेत्यांच्या यादीत टॉप स्थानावर आहेत. कारण वापरा आणि फेकून दया, अशी त्यांची कार्यपध्दती आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘बंटी पाटील जाण नसलेले नेते’
दरम्यान, ‘आपल्या आणि धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याची क्लिप व्हायरल केली जाते. महिलांबाबत इतकी आत्मियता असेल, तर कॉंग्रेसनं आधी करूणा मुंडेंना न्याय मिळवून दयावा, असंही पाटील म्हणाले.’ कॉंग्रेसकडून प्रचाराची पातळी घसरली असून, बंटी पाटील जाण नसलेले नेते आहेत. असा टोला त्यांनी हाणला.
‘कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडूनच खालच्या पातळीवर जावून प्रचार होतोय. आपल्या आणि धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून, चुकीच्या क्लिप व्हायरल केल्या जात आहेत. पण मुळात महाडिक घराण्यामध्ये महिलांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. तर भाजपनं आरक्षण नसतानाही राज्यातील 15 महिलांना आमदार बनवलं आहे. महाडिकांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यापेक्षा कॉंग्रेसनं करूणा मुंडेंना न्याय दयावा’, असंही आमदार पाटील यांनी सुनावलं.
‘माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे’, गृहमंत्र्यांबाबतच्या ‘त्या’ चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
गेल्या चार दिवसांपासून काही महाविद्यालयीन विद्यार्थी, घरोघरी फिरून फॉर्म भरून घेतायत. कुटूंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर लिहून घेतायत, हे विद्यार्थी कुठले, त्यांना कुणी सर्व्हे करायला पाठवलं, याची चौकशी करण्याची मागणी, आपण निवडणूक आयोगाकडं करत असल्याचं चंद्रकांत म्हणाले. तसंच पेटीएमद्वारे मतदारांना पैसे ट्रान्स्फर करण्याचा नागपूरसारखा प्रयत्न कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही तो हाणून पाडू, असा इशाराही चंद्रकांत पाटीलनी दिला.
ADVERTISEMENT











