मुंबई: प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 30 एप्रिल 2026 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयानंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष व्यक्त होत आहे. बच्चू कडूंच्या निर्णयाबाबत माध्यमांशी बोलताना एका कार्यकर्त्याने अत्यंत संतप्त स्वरुपाची प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
'आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही...' असं थेट म्हणत या कार्यकर्त्याने बच्चू कडूंवर जहरी टीका केली आहे. बच्चू कडूंचं राजकीय करिअर कधीच मोठं होणार नाही.. असंही यावेळी या कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
'तुम्ही गुवाहटीला पण स्वत:साठी गेले होते आणि आजही...', पाहा कडूंचा कार्यकर्ता काय-काय बोलून गेला!
'माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं.. अहो ठीक आहे एखादा कलंक लागला आणि जर दिव्यांगाचं भलं होत असेल तर आपण गेलेलं ठीक आहे. पण भाऊ आज तुम्ही कुठल्या तोंडानं सांगणार का गेले म्हणून? ठीकए.. तुम्ही गेले तर गेले ओ.. आमचं राजकीय करिअर संपवून गेले ना.'
'म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं. की, यांची काहीच औकात नाही.. म्हणजे मी जिथे म्हणेल तिथे हे पागल येतील. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले... तुम्ही गुवाहटीला पण स्वत:साठी गेले होते.. आज आम्ही या मतावर ठाम आहोत. आणि जे तुम्ही विधान परिषदेवर गेले हे देखील तुम्ही स्वत:साठीच गेलेत.'
हे ही वाचा>> 'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..' बच्चू कडूंची मोठी घोषणा; प्रहार संघटनेचं काय होणार?
'आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीत, आणि भविष्यातही असणार नाही. आम्हाला एक धडा मिळालाय.. की, चळवळीच्या नावावर कार्यकर्त्याच्या आयुष्याचं वाटोळं करणारा नेता या अगोदरही संपलाय आणि भविष्यातही संपेल.'
'तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्याची जी तळमळ होती.. ही जी हाय लागेल.. भविष्यात तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून.. माझ्या घरावरचे पत्रे विकले आहेत मी.. 10 लाखाचं कर्ज आहे.. 10-15 गाड्या घेऊन जा.. 200 कार्यकर्ते घेऊन या, 400 कार्यकर्ते घेऊन या.. उपाशी पोटी आम्ही संघटन वाढवलंय.. आज आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही..' असं म्हणत या कार्यकर्त्याने आपला संताप व्यक्त केला हे.
बच्चू कडू यांची राजकीय पार्श्वभूमी
बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आहेत. ते दिव्यांग कल्याण, शेतकरी आणि मजुरांच्या मुद्द्यांवर सक्रिय होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिंदे गटात प्रवेश करताना कडू यांनी शेतकरी, दिव्यांग आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची हमी घेतल्याचे सांगितले. मात्र, कार्यकर्त्यांना हा “स्वत:साठी” घेतलेला निर्णय वाटतो.
हे ही वाचा>> 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...', गुवाहटीच्या 'त्या' फोनबाबत बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा
काही ठिकाणी प्रहार संघटना कायम ठेवण्याची भूमिका कडू यांनी व्यक्त केली असली तरी, पक्ष विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि नाराजी पसरली आहे. त्यामुळे प्रहार पक्षाची ताकद असलेल्या अनेक ठिकाणी असंतोष अधिक तीव्र दिसतो आहे.
राजकीय परिणाम
बच्चू कडूंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आणि लगेच उमेदवारी जाहीर झाली.
या घटनेमुळे प्रहार पक्षातील फूट स्पष्ट झाली असून, भविष्यात कार्यकर्ते स्वतंत्र भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT











