सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार? हकालपट्टीच्या मागणीनंतर वारकऱ्यांची पोलिसांत तक्रार

मुंबई तक

• 05:23 AM • 14 Dec 2022

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात दाखल झालेल्या सुषमा अंधारे सध्या चर्चेत आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटाला लक्ष्य करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. उद्धव ठाकरेंकडे सुषमा अंधारेंची हकालपट्टी करण्याची मागणी झाल्यानंतर आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीये. ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची राज्यभर चर्चा आहे. त्याचं […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटात दाखल झालेल्या सुषमा अंधारे सध्या चर्चेत आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटाला लक्ष्य करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीये. उद्धव ठाकरेंकडे सुषमा अंधारेंची हकालपट्टी करण्याची मागणी झाल्यानंतर आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीये.

हे वाचलं का?

ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची राज्यभर चर्चा आहे. त्याचं कारण सुषमा अंधारेंची भाषणं. महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गट आणि भाजप टीकेची तोफ डागणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध आता काही वारकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

काही दिवसांपूर्वी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी सुषमा अंधारे यांची शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हकालपट्टी करण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी भूमिका या संघटनेनं घेतलेली असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यात अंधारेंविरुद्ध तक्रार देण्यात आलीये.

सुषमा अंधारेंविरुद्ध पोलिसांत कुणी दिलीये तक्रार?

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे यांच्यासह इतर वारकरी पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिलीये.

सुषमा अंधारेंबद्दल तक्रारीत काय म्हटलं आहे?

चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या या तक्रारीत म्हटलं आहे की, “गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुषमा अंधारे यांचा हिंदू देवी-देवता आणि साधुसंताबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.”

“हिंदू देवी-देवता, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, तसेच ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल अश्लील भाषेत अवमानजनक व्यक्तव्य करून सर्व वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. वारकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाला, तर उभा महाराष्ट्र पेटू शकतो, या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तत्काळ अवमानजनक असलेल्या व्हिडीओ क्लिपचा तपास करून सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.”

“असे झाले नाही, तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन करू. यातून होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार राहिल, याची शासनाने नोंद घ्यावी,” असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने दिला आहे.

आळंदीत वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

सुषमा अंधारे यांच्या याच वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या आळंदीतील वारकऱ्यांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच चपलेचा हार घालत निषेध केला. आळंदीतील कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

    follow whatsapp