काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? का उपस्थित होतोय हा प्रश्न?

मुंबई तक

• 08:20 AM • 29 Sep 2021

रशिद किडवई काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न देशाला सध्या पडला आहे. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला उभारी देण्याचं काम हे दोन चेहरे करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या राजकारणात भूकंप झाल्याचं पाहण्यास […]

Mumbaitak
follow google news

रशिद किडवई

हे वाचलं का?

काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न देशाला सध्या पडला आहे. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला उभारी देण्याचं काम हे दोन चेहरे करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या राजकारणात भूकंप झाल्याचं पाहण्यास मिळालं एवढंच नाही तर अमरिंदर सिंग हे भाजपच्या वाटेवर आहेत अशीही चर्चा आहे.

गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि JNU चा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या दोघांना काँग्रेसमध्ये घेण्यास काही जुन्या जाणत्यांनी विरोध दर्शवला होता. हे दोघेही काँग्रेसच्या विचारधारेच्या जवळचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी, नेत्यांनी अनेकदा काँग्रेसचं सहकार्य केलं आहे. सीपीआयने इंदिरा गांधी यांना मदत केली होती. त्यानंतर 1991-92 च्या वेळी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते त्यांच्याही संकटात डावे धावून गेले होते.

काँग्रेस सोबत जाणाऱ्या पक्षांची अवस्था एखाद्या विचित्र दिसणाऱ्या आकाशगंगेसारखी आहे. त्यामुळेच त्यात शिवसेना, मुस्लिम लीग असे पक्षही दिसतात. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचीही निवड अशीच काहीशी आहे. मात्र पक्षाच्या विचारसरणीचा अभाव असणाऱ्या लोकांना पक्षात स्थान देणं हे काँग्रेसने अनेकदा केलं आहे. काँग्रेसच्या गोटातील काही ज्येष्ठाचं असंही म्हणणं आहे की डाव्या विचारांच्या लोकांना सोबत घेणं हे काही चुकीचं नाही. डावे पक्ष त्यांना झुकतं माप द्यावं अशी मागणी करू लागतात किंवा आर्थिक वर्चस्व गाजवू लागतात तेव्हा त्यांची समस्या निर्माण होऊ शकते.

कन्हैय्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने एका गटाला असं वाटतं आहे की डाव्यांचे प्राबल्य पक्षात वाढू शकतं. राहुल गांधी यांच्या अर्थशास्त्रीय आणि राजकीय विचारसरणीवर डाव्यांचा काही प्रमाणात प्रभाव आहे, अशात कन्हैय्याला प्रवेश द्यायला नको होता असं काहींना वाटतं. विनोद मेहता आणि अंजली पुरी यांनी 2009 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची मुलाखत घेतली होती. राहुल गांधी हे प्रतिभावान नेते आहेत आणि त्यांना देशात बदल घडवून आणायचा आहे असं वक्तव्य सेन यांनी या मुलाखतीत केलं होतं. याचीही आठवण काही नेते सांगतात.

समाजातल्या वंचित घटकांसाठी काम करण्याची राहुल गांधींची इच्छा आहे त्यामुळे त्यांच्यावर डाव्यांचा प्रभाव आहे असंही म्हटलं जातं. आपल्या देशातील मध्यमवर्गाबाबत बोलायचं झालं तर मध्यवर्गाला राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांनी आखलेल्या आर्थिक धोरणांचा फायदाच झाला. मात्र आता लोक काँग्रेसचा पर्याय म्हणून भाजपचा विचार करत आहेत. 2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीने हे दाखवून दिलं आहे. असं असलं तरीही मोदी सरकारच्या काळात लाखो तरूण, शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे लोक, बेरोजगार, जगण्यासाठी रोज संघर्ष करणारे लोक यांचा मोदींनी भ्रमनिरास केला आहे. आता काँग्रेस डाव्यांना जवळ करून म्हणजेच कन्हैय्या आणि जिग्नेश यांना जवळ करून या वंचित वर्गाच्या जवळ जाते आहे. त्यांच्या माध्यमातून विजय मिळेल अशी आशा काँग्रेसला आहे.

आता काँग्रेसलाही बंडाळ्यांचा शाप आहेच. सगळे राहुल गांधींच्या बाजूने आहेत असं नाही. जी 23 मधले काही घटक असे आहेत की जे राहुल गांधींना कॉर्नर करण्याची संधीच शोधत असतात. तसं घडलं तर पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या ठिकाणी निवडणूक निकालावर परिणाम होईल. राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये सोशल इंजिनिअरींग करत दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवलं. मात्र अमरिंदर सिंग यांना हटवण्यासाठी ज्या सिद्धूंनी मेहनत केली होती त्यांनीच काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं. त्यांनी अवघ्या आठ दिवसांमध्ये हा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्ष आता तिथे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतिहासाचा विचार केला तर काँग्रेसकडे डाव्या विचारांचे अनेक तुर्क होते. नेहरूंच्या युगानंतर इंदिरा गांधी यांचं युग आलं. त्यावेळी त्यांनी डाव्या आणि उजव्या विचारसरणींचा प्रभावीपणे सामना केला. काँग्रेसमधल्या जुन्या जाणत्यांच्या गटात मोरारजी देसाई, वा. बी. चव्हाण, स.का. पाटील, निजलिंगप्पा अशा नेत्यांची फळी होती. तर दुसरीकडे चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत, चंद्रजीत यादव यांची फळी उभी केली.

काँग्रेस जेव्हा आपल्यासोबत कुणाला घेतं त्यावेळी त्यांचे युक्तीवाद आगळेवेगळे असेच असतात. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा शिवसेना काँग्रेस एकत्र आले त्यावेळी काँग्रेसने केलेला युक्तीवाद असाच आहे. शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद यांच्याशी कोणतेही औपचारीक गठबंधन केलेले नाही. मात्र त्यावेळीच काँग्रेसला या गोष्टीचा विसर पडला आहे की मुंबईत 60 च्या दशकानंतर झालेल्या दंगली, 1984 ची भिवंडी दंगल, 92-93 ला झालेलं बाबरी प्रकरण आणि त्यानंतर झालेले दंगे याचा अभिमान वाटत असल्याचं शिवसेनेने म्हटलं होतं. आता मात्र त्याचा विसर काँग्रेसला पडला आहे. शिवसेना हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा पक्ष आहे, मात्र त्यामुळे काँग्रेसला फारसा फरक पडला नाही हेच दिसून येतं आहे.

कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे आता काँग्रेसवासी झाले आहेत. मात्र त्यांनी 16 जानेवारी 1999 ला सोनिया गांधींच्या नेतृत्वात झालेल्या CWC च्या बैठकीतला ठराव जरूर वाचावा. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त केलेल्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की भारत हा देश हिंदूंमुळे धर्मनिरपेक्ष देश आहे. ‘एकम सत्यम, विप्रहा बहुधा’ याचाच अर्थ सत्य एकच आहे त्याचा अर्थ प्रत्येकजण हवा तसा काढू शकतो असंही त्या म्हणाल्या होत्या. आता जिग्नेश मेवाणी आणि कन्हैय्या कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नेमकं काय साध्य होणार हे स्पष्ट होईलच.

    follow whatsapp