कोरोना महामारीविरोधात सुरू असलेल्या भारताच्या लढ्याला आणखी बळ मिळालं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयकडून एका नव्या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. या लसीचा एकच डोस घ्यावा लागणार असून, आपतकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
देशात सध्या दोन डोस घ्यावा लागणाऱ्या लसीचा वापर केला जात असून, त्यात आता एक डोजवाल्या लसीची भर पडली आहे. स्फुटनिक लाईट असं या लसीचं नाव आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DcGI) स्फूटनिक लाईटच्या आपतकालीन वापराला परवानगी दिल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DcGI) सिंगल डोसवाल्या स्फूटनिक लाईट या कोरोना लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. या लशीसह देशात लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशींची संख्या ९ झाली आहे. यामुळे कोरोना महामारीविरोधातील सामूहिक लढ्याला आणखी बळ मिळेल, असं मांडवीय यांनी म्हटलं आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ समितीने दोन दिवसांपूर्वी या लशीच्या वापराला परवानगी देण्याची शिफारस केली होती. स्फूटनिक लाईट लस रशियात विकसित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या इतर लशींप्रमाणे स्फूटनिक लाईटचे दोन डोज घ्यावे लागत नाही. तिचा एकच डोस परिणामकारक आहे. देशातील ही पहिलीच एक डोसवाली लस आहे.
देशात सध्या ८ लशींचा वापर…
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे. विविध लसींचा वापर लसीकरणासाठी केला जात आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या लशींची संख्या आठ असून, स्फूटनिक लाईटचा समावेश झाल्याने ती नऊवर झाली आहे.
भारतात सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, कोव्होवॅक्स, कॉबेवॅक्स, मॉडर्ना, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, जी कोव-डी या लसीचा वापर केला जात आहे. सिंगल डोस असलेल्या स्फूटनिकचा देशात आता वापर केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
