देशभरात गाजत असलेल्या टूलकिट प्रकरणात दिशा रविला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिशाला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. पटियाला हाऊस कोर्टाने तीन दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी आज तिला कोर्टात हजर केलं होतं. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांनी दिशा रविला बंगळुरूतून अटक केली होती. ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक टूलकिट ट्विट केलं होतं. हे टूलकिट तयार करण्यात दिशा रविचा सिंहाचा वाटा होता असं म्हणत यासंदर्भातल्या चौकशीसाठी तिला अटक करण्यात आलं. त्यानंतर तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही मुदत आज संपल्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दिशाला पोलीस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी पोलिसांतर्फे करण्यात आली. मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
ही बातमीही वाचा – ‘टूल किट’ प्रकरणी चर्चेत असलेली निकिता जेकब कोण आहे?
दिशाच्या अटकेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली पोलिसांनी काय म्हटलं होतं?
दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी टूलकिट प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली. 11 जानेवारीला या संदर्भातली झूम मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये दिशा, निकिता आणि शांतनू हे तिघे जण सहभागी झाले होते. 26 जानेवारीच्या आधी ट्विटर स्ट्रोम निर्माण करायचं असा ठराव या मिटिंगमध्ये झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या झूम मिटिंगमध्ये 60 ते 70 जण सहभागी झाले होते. टूलकिट प्रकरणात पोएटिक फाऊंडेशनचाही हात असल्याची बाब दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केली. जानेवारी महिन्यातच टूलकिट तयार कऱण्यात आलं. ज्यामागे आंदोलन सोशल मीडियावर पसरेल आणि जगभरात जाईल असा हेतू होता.
दिशा रविला अटक केल्यानंतर तिची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या चौकशीत निकिता जेकब आणि शंतनू ही नावंही समोर आली होती.
कोण आहे निकिता जेकब ?
निकिता जेकब ही पेशाने वकील आहे. दिवाणी न्यायालयात ती तिच्या केसेस लढते. तिचं ट्विटर हँडल सध्या लॉक करण्यात आलं आहे. तिच्या ट्विटर हँडलवरील ‘बायो’मध्ये निकिता जेकब, एडव्होकेट असा उल्लेख आहे. तसंच सामाजिक न्याय व पर्यावरण रक्षणसंबंधीची कार्यकर्ती असाही उल्लेख आहे. निकिता जेकबने स्वतःचा उल्लेख एक लेखिका आणि गायिका असाही केला आहे. ती एक हौशी छायाचित्रकारही आहे. निकिता जन्माने कॅथलिक असून मुंबईत वास्तव्य करते. दिल्ली पोलिसांनी दिशा रविबद्दल जी माहिती दिली त्यामध्ये तिच्या चौकशीस निकिता जेकब आणि शांतनू ही दोन नावं समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
