अनेकदा नेते मंडळीच्या गाड्यांचा ताफा आपण रस्त्यावरुन जाताना पाहिला आहे. या ताफ्यात महत्वाच्या मंत्री आणि इतर सदस्यांच्या गाडीचं स्टेअरिंग हे सर्वसाधारणपणे पुरुष चालकाकडे असतं. परंतू राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा सिंधुदुर्ग दौरा हा एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार प्रवास करत असलेल्या गाडीचं सारख्य हे महिला पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक यांनी केलं. या गाडीत अजित पवारांसोबत सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री सतेज पाटीलही दिसत आहेत. सोशल मीडियावर मुळीक यांचे अजित पवारांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून याचं कौतुक करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या विकासकामांना दिलेल्या निधीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. याचसोबत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.
राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तृप्ती मुळीक यांचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर टाकत त्यांचं कौतुक केलं आहे. जाणून घ्या तृप्ती मुळीक यांचं कौतुक करताना काय म्हणाले सतेज पाटील?
मुळीक यांचं ड्रायव्हिंग कौशल्य हे वाखणण्याजोगं असून राज्यातील इतर तरुणींना प्रेरणा देणारं आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, असंही सतेज पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
