डोंबिवली: पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विनयभंगाच्या आरोपीचा फिट आल्याने मृत्यू

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: विनयभंगाच्या प्रकरणातील एका आरोपीचा फिट आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दत्तात्रेय वारके असं या आरोपीचं नाव असून एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. पण अचानक फिट आल्याने त्याचा त्यातच मृत्यू झाला. नेमकं प्रकरण काय? […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:17 PM • 28 Feb 2022

follow google news

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: विनयभंगाच्या प्रकरणातील एका आरोपीचा फिट आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. दत्तात्रेय वारके असं या आरोपीचं नाव असून एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. पण अचानक फिट आल्याने त्याचा त्यातच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

दत्तात्रेय वारके या आरोपीविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दत्तात्रेय हा एका बिल्डरकडे कामाला होता. 2013 साली त्याने घर विकण्याचं आश्वासन देत एका महिलेकडून पाच लाख रुपये घेतले होते. मात्र अद्याप त्याने महिलेला घर किंवा दिलेले पैसे यापैकी काहीही दिलं नव्हतं.

यासंदर्भात महिलेने वारंवार दत्तात्रयकडे तगादा लावला होता. मात्र दत्तात्रय काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याच दरम्यान, एके दिवशी फोनवर त्याने महिलेसोबत अश्लील संभाषण केलं. त्यानंतर सदर महिलेने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेचे महिलेने मानव अधिकारासह इतर ठिकाणी सुद्धा तक्रारी दिल्या होत्या.

यावेळी मानपाडा पोलीस ठाण्यात दत्तात्रय विरोधात महिलेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 26 फेब्रुवारीला जळगावहून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी कोव्हिड रिपोर्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी दत्तात्रय याला पोलीस स्टेशनच्या आयसोलेशन रूममध्ये ठेवले होते. त्याची कोव्हिड चाचणी देखील करण्यात आली होती. पोलीस रिपोर्टच्या प्रतिक्षेत होते. मात्र, आज (28 फेब्रुवारी) पहाटे अचानक त्याला फीट आली आणि तो बेशुद्ध झाला. यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दत्तात्रयचा मृत्यू झाला.

धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय याचे संपूर्ण कुटुंब हे भुसावळला राहतं. दुर्दैवी बाब म्हणजे कालच त्याचा भावाचा देखील अपघात झाला आहे. दुसरीकडे फीट आल्याने दत्तात्रयाचा मृत्यू झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

आरोपी दत्तात्रय याचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून डॉक्टरांच्या पॅनलखाली त्याचे शवविच्छेदन होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस ताब्यात असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे.

    follow whatsapp