Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा सगळ्या जगासाठीच काळजी वाढवणारा ठरतो आहे. डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस घेब्रेयसस यांनी ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात मृत्यू होत आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग होत असून […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:23 AM • 07 Jan 2022

follow google news

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा सगळ्या जगासाठीच काळजी वाढवणारा ठरतो आहे. डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस घेब्रेयसस यांनी ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात मृत्यू होत आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

हे वाचलं का?

कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग होत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचं सांगितलं आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनने डेल्टालाही मागे टाकलं असून याचा अर्थ रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचं दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावं असा होत नाही असंही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. ‘मागील अनेक व्हेरिअंटप्रमाणे ओमिक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे.’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

‘खरं तर केसेसची त्सुनामी इतकी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोजा वाढला आहे.’ असं ते म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात जगभरात 90 लाख 5 हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल 71 टक्क्यांची आहे असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरातल्या अनेक देशांची काळजी वाढवली आहे. जगभरात हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. WHO ने ओमायक्रॉन या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे. या व्हेरिएंटबाबत UK च्या वैज्ञानिकांनी एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की जर या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले नाहीत तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडन येथील स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेच्या स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

लस घेतलेल्यांचंही ‘ओमिक्रॉन’ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?

NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.

यात काही म्युटेशन आधीपासूनच असल्याचं आढळून आलं आहे. ज्यात अल्फा आणि डेल्टाचे म्युटेशनचा समावेश आहे. आतापर्यंत क्वचित असं आढळून आलं आहे, असंही NGS-SA ने या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटबद्दल म्हटलं आहे. व्हायरस प्रभावित करण्याची क्षमता आणि लसीचा प्रभाव याबद्दलचा अभ्यास केला जात असल्याचं आफ्रिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सेंटर फॉर डिजिज कंट्रोल) म्हटलं आहे.

    follow whatsapp