‘असा मुख्यमंत्री बघितला का?’; फडणवीसांचं कौतुक करताना शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा

मुंबई तक

23 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:52 AM)

राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रस्तावावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवदेन केलं. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. त्याचबरोबर पन्नास खोके एकदम […]

Mumbaitak
follow google news

राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पावसाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रस्तावावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवदेन केलं.

हे वाचलं का?

या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. त्याचबरोबर पन्नास खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून दिल्या जात आहे. त्यावरूनही शिंदेंनी विरोधकांना सूचक इशारा दिला.

एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिला सूचक इशारा

एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहितीये की मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो. मला सवय आहे. कुठल्याही विषयाची माहिती करून घेण्यात काहीही गैर नाही. सगळं माहितीये, समोरच्याला काही माहिती नाही, असं डोक्यात कधीच नसतो. आमचे उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघंही फिल्डवर काम करणारे आहोत.”

गुवाहाटीला गेलो, तेव्हा ५० लाखांची मदत केली -एकनाथ शिंदे

अजित पवारांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपण एकत्र काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असो वा नसो. तरीही जेव्हा जेव्हा, तिथे कुठे संकट आलं… मग कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, महाड असो. महाड चिपळूणमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती महाड चिपळूणमध्ये? भास्करराव इकडे आहेत. आपल्या सगळ्यांना माहितीये.”

“राज्याच्या बाहेरही मदत केली. केरळला मोठ्या प्रमाणात मदत केली. उत्तराखंडमध्ये मदत पाठवली. सरकार काम करत असतं. गुवाहाटीला होतो, त्यावेळी तिथे पूर होता. काही लोकांनी टीका केली की तिथे मज्जा मारायला गेले. आम्ही तिथे ५० लाखांची मदत केली. आम्ही संवेदनशील आहोत.”

“प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण. तुम्ही रोज इथे बोलता आहात. आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट बोलू शकतो. आमच्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे, कारण आम्ही तुमच्यासोबत काम केलेलं आहे. चिठ्ठा सगळ्यांचा आहे. सगळं काढू शकतो, पण आम्हाला कामाने उत्तर द्यायचं आहे. परंतु सहन करण्याची सीमा असते. मर्यादेच्या पलिकडे गेल्यानंतर कुणीही कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही.”

“मला राजकारण करायचं नाही. पण मी रोज जे ऐकतोय. जे रोज पाहतोय. यावरून मला हे बोलणं आवश्यक वाटतं. प्रत्येक माणसाकडून काम करताना काहींना काही राहून जातं. ते शोधण्याचं काम मी करत नाही, पण ती वेळ माझ्यावर कुणी आणू नये, असं माझं सांगणं आहे. मी इशारा देत नाहीये. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय.”

३ वाजेपर्यंत काम करणारा मुख्यमंत्री भेटला होता का?

“भुजबळ साहेब रात्री ३ वाजेपर्यंत मी लोकांना भेटलोय. सकाळी ६ वाजता मी ब्रीफिंग घेतलंय. त्यामुळे मला राजकारण करायचं नाही. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मी त्यांचं काम बघितलं आहे. ३ वाजेपर्यंत, ४ वाजेपर्यंत कुठला मुख्यमंत्री भेटतो. कधी भेटला होता का? आपण पाहिलं का? आपल्याला सगळं माहितीये. एकच सांगतो, सहन करण्याची मर्यादा असते, कारण माणूस आहोत. त्यामुळे जिथे संकट येतं तिथं मी धावून जातो.”

    follow whatsapp