मोबाईलवरुन ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या १० जणांना गडचिरोलीतील आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे आष्टी, अहेरी व चंद्रपूर येथील आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराकरता वापरण्यात येणारे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
ADVERTISEMENT
पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेटवार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे, अहेरी परिसरातील सुरेंद्र शेळके, संदीप गुद्दपवार यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी तपासादरम्यान सर्वजण बीईटीएक्स वन डॉट कॉम आणि एनआयसीई डॉट ७७७७ डॉट नेट या बेकायदेशिर ऑनलाईन जुगार प्लॅटफार्मच्या माध्यमातून क्रिकेट, फूटबॉल व इतर बाबींसंबंधी बुकी म्हणून काम करीत असल्याचं समोर आलं. चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजिक अब्दूल खान व महेश अल्लेवार हे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशिररित्या ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक असून, ते यूजर आयडी आणि पासवर्डद्वारे एजंट व क्लायंट तयार करतात, अशी माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली.
यानंतर पोलिसांनी चंद्रपुरातील तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दहाही आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ऑनलाईन जुगाराकरिता वापरण्यात येणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
