मुंबई: हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (UBT) ने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील फडणवीस सरकारला त्रिभाषा सूत्राचा शासन आदेश हा मागे घ्यावा लागला. ज्यानंतर मनसे आणि शिवसेना (UBT) ने याचसाठी उद्या (5 जुलै) एकत्रित विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. ज्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. त्याआधी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत मेळाव्याविषयी बोलताना म्हणाले की, 'हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस असेल. महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता असलेल्या या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक यायला निघाले आहेत.'
'या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र करत असून उद्या सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा जल्लोषाचा दिवस आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे मराठीचा विजय झाला आहे.' असं राऊत म्हणाले.
रामदास कदमांचं वक्तव्य
दरम्यान, याच वेळी संजय राऊत यांनी रामदास कदमांवर जोरदार टीकाही केली. 'मिंधे गटाच्या लोकांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं बघवत नाही. तसेच जे मोदी आणि अमित शाहांचे झाले आहेत त्या नेत्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल बोलू नये. त्यांनी स्वत:ची चिंता करावी.' असा टोलाही राऊतांनी रामदास कदमांना लगावला आहे.
हे ही वाचा: वाल्मिक कराडच्या समर्थकाचं घृणास्पद कृत्य! मतिमंद मुलीवर अत्याचार अन्...
मनसे-शिवसेनेचा एकत्रित विजय मेळावा नेमका कसा असणार?
उद्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरलेली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत. अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय नेमकं कोण-कोण भाषण करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. याशिवाय इतर कोणते नेते या मेळाव्याला हजेरी लावणार याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे ही वाचा: "मराठीतच बोलावं लागेल" म्हणत हिंदीत दम भरला, मनसैनिकांनी स्टॉल चालकाला केली मारहाण
ठाकरेंच्या विजयी मेळाव्याची नांदी म्हणजे महापालिकेसाठी युती?
मराठीच्या मुद्द्यावर भाजप आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात मनसे आणि शिवसेना (UBT) हे यशस्वी ठरले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतला. असं असलं तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यासाठीच 5 जुलै रोजी होणारा विजय मेळावा हा त्या युतीची नांदी ठरू शकतो.
ADVERTISEMENT
