गडचिरोली : आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

–व्यंकटेश दुधमवार, गडचिरोली आमदाराच्या निवासस्थानी नियुक्ती करण्यात आलेल्या पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे पोलीस शिपायाने राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली असून, प्रमोद शेकोकर असं मयत पोलीस शिपायाचं नाव आहे. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. प्रमोद शेकोकर हे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:12 PM • 21 Feb 2022

follow google news

व्यंकटेश दुधमवार, गडचिरोली

हे वाचलं का?

आमदाराच्या निवासस्थानी नियुक्ती करण्यात आलेल्या पोलीस शिपायाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे पोलीस शिपायाने राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली असून, प्रमोद शेकोकर असं मयत पोलीस शिपायाचं नाव आहे. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रमोद शेकोकर हे प्राणहिता पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची पत्नीही पोलीस दलात असून, ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहे. रविवारी (२० फेब्रुवारी) रात्री त्यांनी अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीमधील राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आत प्रवेश केला. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात शेकोकर यांचा मृतदेह आढळून आला.

आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. प्रमोद शेकोकर हे मूळचे मलकापुर येथील पंतनगर परिसरातील रहिवासी आहेत.

त्याच्या आत्महत्येनं संपूर्ण परिसरातील शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर २२ फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्या सकाळी ९ वाजता मूळ गावी मलकापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp