छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटांबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हा वाद वाढताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर मनसेनं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटांचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ऐतिहासिक तथ्याशी छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दिला. इतकंच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचंही दिसलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर रात्री ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे अविनाश जाधव, तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं दिसलं.
‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी-मनसे भिडले : ठाण्याच्या मॉलमध्ये तुफान राडा
ठाण्यात झालेल्या या राड्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलंय. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीये. “राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही”, असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय.
अफजल खानाचे उद्दातीकरण करणारे आव्हाड महाराष्ट्राला छत्रपती सांगणार? गजानन काळेंची टीका
संदीप देशपांडे यांच्याबरोबरच गजानन काळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलीये. “उठता बसता लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे पवारसाहेब व सुप्रियाताई या गुंड व दादागिरी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडबद्दल काही बोलणार की नाही? आव्हाड यांना इतिहास तज्ञ असल्याचा सातबारा मिळाला आहे का? अफजल खानाचे उद्दातीकरण करणारे आव्हाड महाराष्ट्राला छत्रपती सांगणार?”, अशी टीका गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलंय.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करू नका’; संभाजीराजेंनंतर जयंत पाटलांचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचीही वादात उडी
शिवेंद्रराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडताना लोकांना बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. “चित्रपटांमधे इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचा खेळ करू नये,” असा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिलाय.
“असं केल्यास या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कार टाकावा. हे चित्रपट पाहू नये,” असं आवाहनही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
