Tanaji Sawant : ‘तर’ मुख्यमंत्र्यांसहित एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही, मराठा समाजातील नेते आक्रमक

मुंबई तक

• 05:57 AM • 26 Sep 2022

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावंत यांच्या या वक्तव्यावरुन […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : मागील काही दिवसांपासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडत आहेत. बीडमधील धनंजय मुंडे यांच्यावरील वादग्रस्त टीकेनंतर त्यांनी आता मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आरक्षण जाऊन दोन वर्ष झाले तेव्हा गप्प राहिले मात्र आता सत्तांतर होताच तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे म्हटल्याने सावतं वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

हे वाचलं का?

सावंत यांच्या या वक्तव्यावरुन समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय मराठा समाजातील नेतेही सावंताविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, वक्तव्याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनातील समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.

काय म्हणाले योगेश केदार?

योगेश केदार म्हणाले, सावंत यांनी मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने विरोध केला. आंदोलकांना विरोधी पक्षांनी सोडलेली पिलावळ असे संबोधित केले. तसेच आज ओबीसीतून आरक्षण मागत आहे दोन महिन्यांनी एससी मधून आरक्षण मागतील, असेही बोलले.

यातून सावंत यांनी दलित समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उलट दलित समाज मराठ्यांच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देत आहे. कारण त्या समाजातील जाणकारांना माहिती आहे की, मराठा समाज एससीचे आरक्षण मागत नाही. हे वास्तव तानाजी सावंत यांना माहिती नसावे.

हो मराठ्यांची ओबीसीमधूनच आरक्षण ही ठाम मागणी आहे आणि राहील. पण एक जबाबदार मंत्री मराठा समाजाच्या भूमिकेला विरोध कसा करु शकतो? याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना निवेदने पाठवली जातील. मात्र जर त्यांनीही या बाबीला हलक्यात घेतले तर मात्र मराठा समाज त्यांच्यासहीत एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही योगेश केदार यांनी दिला.

काय म्हणाले तानाजी सावंत?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्यांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, असं सावंत म्हणाले. युती सरकार असताना आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्याला मुका मोर्चा म्हणून हिणवलं, मराठ्यांचा अपमान केला, आम्ही गप्प राहिलो. पण 2017-2018 मध्ये त्यात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन बॅच निघाले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या, असं सावंत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार येताच आरक्षण गेलं : तानाजी सावंत

2019 साली ज्यावेळेस तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यात आरक्षण गेलं. आम्हा मराठ्यांना काही कळत नाही का? तेव्हा काही आंदोलन वगैरे झालं नाही. सगळे शांत बसले. पण जसंच सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, अशा शब्दात तानाजी सावंतांनी वादग्रस्त विधान केलं. पुढं बोलताना ते म्हणाले, बघा डोकं कसं चालवलं जातं आज ओबीसींमधून आरक्षणाची मागणी केली, पुढच्या दोन महिन्याने एससी प्रवर्गातून मागणी करतील. याच्या मागचा करता करविता कोण आहे? हे जाणून घेणं गरजेचं आहे, असं सावंत म्हणाले.

    follow whatsapp