पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही उडी घेतली आहे. एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर आक्षेप येत असतील तर इतकी वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. तसंच हा प्रकल्प रद्द झाल्यास जनआंदोलन करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले अमोल कोल्हे :
अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि ट्विटवरुन याबाबत काही सवाल करत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आता प्रकल्पाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, ते डीपीआर सुरु करताना का घेतले गेले नाही? रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली, तेव्हा का हे आक्षेप नव्हते? नियोजन आयोगाने मंजुरी दिली तेव्हा का हे आक्षेप नव्हते? एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर हे आक्षेप येत असतील तर याबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित होतात. इतकी वर्षे झोपा काढल्या का?
एमआरआयडीसीने डेव्हलप केलेल्या या प्रकल्पाची थेट अंमलबजावणी होतेय, याबद्दल रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांना तर पोटशूळ उठला नाही ना? हा कोणाच्याही व्यक्तिगत हिताचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असा गाजावाजा आपण करत असताना पहिल्यांदा ब्रॉडगेजवर होणारी ही हायस्पीड रेल्वे आहे. ही इंडियन टेक्नॉलॉजी आपण नाकारतोय आणि महागड्या परदेशी टेक्नॉलॉजीला पायघड्या घालतोय. मग आत्मनिर्भर भारत कुठे गेला?
सर्व टप्पे या प्रकल्पाने पार केले. सर्व प्रकारच्या मंजुऱ्या, गुंतवणूकपूर्व हालचाली, रेल्वे बोर्डाच्या मंजुऱ्या, नियोजन विभागाची मंजुरी असे सगळे टप्पे पार केल्यानंतर अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून हा प्रकल्प गुंडाळला जात आहे. जगातील सर्व हायस्पीड रेल्वे जमिनीवरूनच सुरु झाल्या. मग पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेलाच जमिनीवरून नेण्यास विरोध का? राजकीय हेतू बाजूला ठेवून पुणे ते नाशिक या भागातील सर्वांगीण विकासासाठी वरदान ठरू शकणारा हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग अंमलात आलाच पाहिजे.
हा प्रकल्प गेला तर ‘त्या’ राजकीय पक्षांच्या कोणत्याही नेत्याला या मतदारसंघात फिरता येणार नाही. यासंदर्भात मा. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि संसदेतही याबद्दल आवाज उठवणार आहे. यातूनही काही मार्ग निघाला नाही, तर हा प्रकल्प व्हावा म्हणून जनआंदोलन करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही! असे गंभीर इशारे अमोल कोल्हे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहेत.
पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाचा वाद काय?
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर आहे. यासाठी अनेक भागात भूसंपादन सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती.
यावेळी त्यांनी सांगितले कि, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा ॲडग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी घेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून त्यामध्ये रेल्वे कम रोड प्रकल्प अवलंबवण्याची सूचना रेल्वे मंत्र्यांनी केली आहे. शिवाय हायस्पीड रेल्वेसाठी हा मार्ग फास्ट ट्रेड असल्याने रेल कम रोड मुळे अधिकाधिक सोयीस्कर होणार आहे, असं ते म्हणाले होते.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प :
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जवळपास 235 किलोमीटरचा आहे. तब्बल 16 हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पात राज्य सरकारचा 3 हजार 273 कोटींचा वाटा आहे. या मार्गावरील 1 हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
सध्या पुणे – नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी कल्याणला येऊन रेल्वे पकडावी लागते. या प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. यासाठी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आली.
ADVERTISEMENT
