चंद्रपुरात कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून २० जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गॅलरी कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चंद्रपुरातील वरोरा येथे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर खासदार बाळू धानोरकर यांच्यामार्फत या आमदार चषक कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
कबड्डीच्या पहिल्या सामन्यादरम्यान रात्री ९ वाजल्याच्या दरम्यान मैदानाच प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. याचदरम्यान मैदानाच्या एका भागातली प्रेक्षक गॅलरी कोसळली. या घटनेमुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरीही झाली. परंतू यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नसल्याचं समजतंय.
या अपघातात २० जण जखमी झाले असून यात एका लहान बालकाचाही समावेश असल्याचं कळतंय. यातील ७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान खासदार धानोरकर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका असतानाही मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमवण्यात आली. ज्यात कोणत्याही पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालेलं दिसलं नाही.
ADVERTISEMENT












