“एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी घेऊन मला...”; मनोज जरांगेंनी थेट शिंदेंना आव्हान देत उडवून दिली खळबळ!

मुंबई तक

20 Oct 2026 (अपडेटेड: 20 Oct 2026, 03:41 PM)

नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन आपल्याला दिल्याच्या कथित चर्चेवरून गंभीर सवाल उपस्थित केले. या आरोपांवर शिंदे यांनी आजच खुलासा करावा, असं आव्हान देत जरांगे यांनी पुरावे असल्याचा दावाही केला.

manoj jarange 500 crore allegation eknath shinde bjp dussehra rally

मनोज जरांगेंकडून खळबळजनक आरोप

Google CTA

नारायणगड (बीड): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून केलेल्या एका गंभीर आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन आपल्याला दिल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी केला. हा आरोप खरा आहे की खोटा, याचा एकनाथ शिंदे यांनी आजच खुलासा करावा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

जरांगे यांनी आपल्या भाषणात या कथित आर्थिक व्यवहारामागे मोठं षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, या प्रकरणाशी संबंधित पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा करत संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

नारायणगडावरील दसरा मेळाव्यात बोलताना मनोज जरांगे यांनी सुरुवातीला गेल्या काही वर्षांपासून आपल्याबाबत सुरू असलेल्या कथित आर्थिक व्यवहारांच्या चर्चेचा उल्लेख केला. आपल्याला भेटण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, असं आपण यापूर्वीच मराठा समाजाला सांगितलं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

हे ही वाचा>> ..तर 2029 मध्ये 'त्या' नेत्यांना निवडून द्यायचं नाही, जरांगेंचा थेट इशारा

जरांगे म्हणाले की, त्यांना काही गोष्टी सात ते आठ महिन्यांपूर्वी समजल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या वेळी या गोष्टी मनातून काढून टाकल्या. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसल्यानंतर आठव्या किंवा नवव्या दिवशी पुन्हा एकदा या प्रकरणाशी संबंधित माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणात अडीच ते तीन वर्षांपूर्वी काहीतरी गंभीर घडलं असून, त्याबाबत आपल्याला पुराव्यांसह माहिती मिळाल्याचं जरांगे यांनी सांगितलं.

भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा शिंदेंवर आरोप?

मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात थेट एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. दिल्लीतील भाजपचे काही नेते आणि महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांमध्ये आपल्याला 500 कोटी रुपये देण्याबाबत चर्चा झाली होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जरांगे यांच्या दाव्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना आपल्यासाठी 500 कोटी रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं होतं का, हा त्यांच्या प्रश्नाचा मुख्य मुद्दा आहे.

हे ही वाचा>> बांगलादेशचं नाव घेत सत्ता बदलावर मोहन भागवत यांचं मोठं विधान

तसेच, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून हे पैसे घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवल्याची चर्चा होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. या कथित व्यवहारात खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं जात असल्याचा दावाही जरांगे यांनी केला.

हे सर्व आरोप आणि दावे मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात केले आहेत.

“आजच उत्तर द्या”; एकनाथ शिंदेंना थेट आव्हान

मनोज जरांगे यांनी या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. शिंदे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या दिवशीच या प्रश्नाचं उत्तर द्यावं किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत खुलासा करावा, असं आव्हान त्यांनी दिलं.

जर आपल्याला 500 कोटी रुपये दिले नसतील, तर हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगावं. आणि जर पैसे दिले असतील, तर त्याबाबतही सत्य समोर आणावं, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.

'शिंदे साहेब खोटं बोलले भाजपला.. की, त्यांच्याकडून 500 कोटी घेतले आणि मला दिले म्हणून सांगितले. 500 कोटी कुठे आहेत? 500 कोटी शेततळ्यात पुरावे लागतील. 2 एकरच्या एवढ्या मोठे ढीग असेल.'

'शिंदे साहेब.. हे जर खोटं असेल तर तुम्ही दिलखुलास सांगावं हे खोटं आहे. मग मी बघतो मी त्यांच्याकडे.. आणि खरं असेल तरी सांगावं. की हे खरं आहे.. मी माझ्या पोराच्या हाताने तुला 500 कोटी दिले.'

“तुम्ही मला 500 कोटी दिले का? तुम्ही जर मला दिले नसतील, तर भाजप नेमकं तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवताय?” असा सवाल करत त्यांनी या कथित प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं सांगितलं.

“माझ्याकडे पुरावा आहे”; कथित चर्चेचा जरांगेंकडून उल्लेख

या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला. संबंधित नेत्यांमध्ये झालेली चर्चा उघड करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. ही चर्चा जवळपास 30 ते 40 मिनिटांची असल्याचं सांगत, त्यातील माहिती समोर आल्यास अनेकांना धक्का बसेल, असा दावाही त्यांनी केला.

जरांगे यांनी या कथित चर्चेमध्ये एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव असल्याचंही म्हटलं. तसेच, या प्रकरणात आपल्याला बदनाम करण्याचा किंवा आपल्याविरोधात षडयंत्र रचण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय व्यक्त केला.

'त्याच्यात खूप मोठा कट आहे. एकूण जो पुरावा आहे ना सगळा.. तुमच्या पायाखालची माती सरकणार आहे. इतकी भयंकर गुप्त चर्चा आहे ती. जरांगे-पाटील कसा मारायचा. समजून घ्या हा.. पुरावा दे म्हणलं आधी.. कसा मारायचा. त्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे.. तो बाळासाहेब ठाकरेंना म्हणालेला की, बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे. तर त्यात एवढी भयाण कमेंट आहे त्यांच्याबद्दल.. त्या नेत्याने जर ऐकलं ना.. तर उद्याच तो पक्ष सोडेल.' 

मात्र, त्यांनी उल्लेख केलेले पुरावे नेमके काय आहेत, त्यामध्ये कोणाची नावं आहेत हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

“मला बदनाम का करता?”; प्रकरणाच्या मुळाशी जाणार

आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा पसरवली जात असेल, तर त्यामागचा उद्देश काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. भाजपचे नेते खोटं बोलत आहेत की एकनाथ शिंदे यांच्याबाबत सुरू असलेली चर्चा खोटी आहे, याचा उलगडा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणाची पत्रकारांनीही सखोल चौकशी करावी आणि संपूर्ण सत्य समोर आणावं, असं आवाहन त्यांनी माध्यमांना केलं.

“तुम्ही खोटं बोलून भाजपच्या नेत्यांकडून 500 कोटी माझ्यासाठी का आणले?” असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टता मागितली.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची शक्यता

मनोज जरांगे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात केलेल्या या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलन आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, तसेच जरांगे यांनी सांगितलेले पुरावे ते सार्वजनिक करतात का, याकडे लक्ष लागलं आहे.