मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: कल्याण-शीळ रस्त्यावर सोमवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातात शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या कारचाही समावेश असून यात त्यांचा मुलगा हरमेश हा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम चालू असल्याने वारंवार अपघात होत असून वाहनचालक आणि प्रवासी हैराण आहेत.
ADVERTISEMENT
कल्याण-शीळ रस्त्यावर सोमवारी रात्री पुन्हा एक विचित्र अपघात झाला. शीळ फाट्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या तीनचाकी टेम्पोने दुभाजकाला धडक दिल्याने हा टेम्पो पलटी झाला. त्याच्या मागून येणाऱ्या व्हॅगनआर कारने टेम्पोला धडक दिली.
दोन्ही वाहनचालक पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शीळ फाट्याहून एक मर्सिडीज कार आली. त्या कारमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचा मुलगा हरमेश शेट्टी आणि त्यांचा चालक होता.
मधोमध उभ्या असलेल्या व्हॅगनआर आणि टेम्पोला पाहून गाडी बाजूने काढण्याचा त्यांनी विचार केला. मात्र गाडी भरधाव वेगात होती. हीच गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढून पलटी झाली. या अपघातात हरमेशला किरकोळ मार लागला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कल्याण-शीळ रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. सुरु असलेले काम आणि दुसरीकडे अर्धवट कामांमुळे दररोज अपघात होत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण आहेत. या रस्त्याच्या अर्धवट कामासाठी कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी बसचा अपघात, तीन कामगारांचा मृत्यू
कल्याण-शीळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे सहापदरी काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरुच आहे. काम संथ गतीने सुरु असल्याने वारंवार लोकप्रतिनिधींना सवाल विचारले जात आहेत.
संतप्त झालेल्या मनसे आमदारांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की, रस्त्याच्या कामामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लोक आम्हाला घरी येऊ देणार नाहीत. वारंवार तक्रार करुन सुद्धा अनेक ठिकाणी अर्धवट कामं राहिल्यामुळे अपघात होत आहेत.
ADVERTISEMENT
