मुंबई : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. सोबतच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच अतिवृष्टीमुळे आणि पूरसदृश्य परिस्थितीमुळे शेती आणि इतर मालमत्तेचे मोठं नुकसान झाल्यानं एनडीआरएफ आणि एसडीआरएफ निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावी अशी मागणी पवार यांनी केली.
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?
प्रामुख्यानं अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, खरिपाचे संपूर्ण पीक गेले असून रब्बी हंगामातील पेरणीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. बऱ्याच ठिकाणी जमिनी वाहून गेल्या असून घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. त्यामुळे राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसंच पुण्यातील प्रश्नांकडेही यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं लक्ष वेधलं. पुणे महापालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील पाणी, रस्ता, कचरा, ड्रेनेज अशा मुलभूत सोयींसाठी तातडीनं निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही पुरेसा निधी न मिळाल्यानं या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितल. तसंच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली.
पुण्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचण्याचे प्रकार झाले होते. हा प्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे पवार यांनी मांडला. स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला ‘अव्यवस्थेची’ कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, असं नुकतचं त्यांनी ट्विट करुन म्हटलं होतं.
यासोबतच राज्यातील विकास कामांवरील स्थगिती उठवावी, आशा सेविकांना किमान वेतनं लागू करावं, अहमदनगर येथील बर्डे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, बदलापूर शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीवरील पूर नियंत्रण रेषा संदर्भांत सर्वसामान्यांना विचारात घ्यावे, विनाअनुदानित शाळांचा प्रश्न सोडवावा, अशा अनेक मागण्या या पत्रातून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.
ADVERTISEMENT
