Lockdown : अहमदनगरने राज्याची चिंता वाढवली! ६१ गावांमध्ये आजपासून कडक लॉकडाउन

मुंबई तक

• 07:33 AM • 04 Oct 2021

राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग घटत असताना अहमदनगर जिल्ह्याने मात्र चिंतेत भर टाकली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असून, जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. या गावातील शाळा आणि […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग घटत असताना अहमदनगर जिल्ह्याने मात्र चिंतेत भर टाकली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असून, जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. या गावातील शाळा आणि मंदिरेही बंदच राहणार आहेत.

हे वाचलं का?

अहमदनगरच्या कोरोना बाधितांची संख्या पुण्यातील रुग्णालयांत वाढत असल्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन अहमदनगरमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचा आदेश नुकताच दिला होता. यामध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत. श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे.

कडक लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकानं सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांतून फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. अनेकदा आढावा बैठका घेतल्या, उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र फरक पडला नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी अलीकडेच अहमदनगरला भेट देऊन २० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत कोरोना समित्यांमार्फत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, मात्र तरीही फरक पडलेला नाही.

अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ४० टक्के रुग्ण असल्याची माहिती पुढे आली. त्यावर हे रुग्ण कोणत्या गावांतील आहेत, तेथील परिस्थिती का अटोक्यात येत नाही, याचा शोध घेऊन कडक उपाय करण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार आता २० नव्हे तर १० पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नव्या आदेशामुळे ऐन सणासुदीत कडक लॉकडाऊनला सामोरं जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. १४ पैकी ११ तालुक्यांतील ६१ गावांची यादी तयार करण्यात आली असून, ४ ते १३ ऑक्टोबर काळात क़डक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नगर, जामखेड व राहुरी तालुक्यातील एकाही गावाचा यामध्ये समावेश नाही.

    follow whatsapp