Wife Kills Husband : एका महिलेने प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने संपवले आहे. ही हत्या करण्यासाठी त्यांनी एका अल्पवयीन मुलाचीही मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रियकराने महिलेच्या पतीची हत्या करुन अपघाताचा बनाव रचला. मात्र महिनाभरानंतर कॉल डिटेल्समुळे आरोपींचा बनाव उघडकीस आला. महिला, तिचा प्रियकर आणि अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरातील ही घटना आहे. भजनलाल असं मृत पतीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
प्रेमसंबंधातून हत्येचा कट
पोलीस अधीक्षक अमृता दुहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रादेवी आणि प्रभुदयाल यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या संबंधात अडथळा ठरणाऱ्या भजनलाल यांना संपवण्याची योजना या दोघांनी आखली होती. 16 जानेवारी रोजी जेव्हा भजनलाल आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले, तेव्हा इंद्रादेवीने तातडीने प्रियकर प्रभुदयालला फोन करुन त्याच्या लोकेशनची माहिती दिली. या माहितीच्या आधारे प्रभुदयाल एका अल्पवयीन साथीदारासह भजनलाल यांचा पाठलाग करु लागला.
हत्या करुन अपघाताचा बनाव
भजनलाल यांना वाटेत गाठून प्रभुदयाल आणि त्याच्या साथीदाराने लाठी-काठीने बेदम मारहाण केली. ते अर्धमेले झाल्यावर प्रभुदयालने दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. ही हत्या नसून अपघात वाटावा, यासाठी आरोपींनी भजनलाल यांचा मृतदेह आणि त्यांची दुचाकी इंदिरा गांधी कालव्यात फेकून दिली. 2 फेब्रुवारी रोजी फलोदी परिसरात कालव्यात एक मृतदेह आढळल्यानंतर त्याची ओळख पटली आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
हे ही वाचा : बीड: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी लावल्याने दोन गटांत वाद; थेट तिघांवर चाकूने हल्ला अन् एक ठार...
कॉल डिटेल्समुळे आरोपी ताब्यात
भजनलाल यांचे वडील कृष्णलाल यांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कॉल डिटेल्सच्या आधारे इंद्रादेवीची चौकशी केली असता, तिचे आणि प्रभुदयालचे गुपित उघड झाले. पोलिसांनी इंद्रा देवी आणि तिचा प्रियकर प्रभुदयाल यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या पत्नीनेच महिनाभर पतीच्या मृत्यूचे नाटक करून हे क्रूर कृत्य लपवून ठेवल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT











