राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमी चर्चेत असतात. सध्या विधानपरिषदेवर १२ सदस्यांच्या नियुक्तीवरुन सरकार आणि राज्यपालांमध्ये वाद सुरु आहे. अशातच कोश्यारी यांच्या आणखी एका वादग्रस्त विधानामुळे राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमजोर बनला असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. कारगिल दिवसानिमीत्त राज भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ADVERTISEMENT
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. त्यांना नेहमी वाटायचं की ते शांतीदूत आहेत. देशासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं, पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ सुरु होतं.
वाजपेयींच्या काळात अणुचाचणी झाली. खरं पहायला गेलं तर हे तंत्रज्ञान २० वर्षांपासून आपल्याकडे तयार होतं. परंतू त्याआधीच्या सरकारनी अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणी झाल्यानंतर भारतावर जागतिक निर्बंध आले, परंतू वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, असंही कोश्यारी म्हणाले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही हजर होते.
कारगिल विजय दिवसानिमीत्त सीमेवर लढलेल्या जवानांचा आणि त्यांच्या परिवाराचा राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नेहरुंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आता सत्तापक्षातील नेते काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं आहे.
Vijay Divas : कारगीलमध्ये 22 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी पाकिस्तानचा पराभव करून भारताने फडकवला तिरंगा
ADVERTISEMENT
