कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून, आता निर्बंध शिथिल करण्याची मागणी भाजपाकडून सातत्यानं केली जात आहे. यात मंदिरं खुली करण्यासह इतरही मागण्यांचा समावेश असून, भाजपच्या मागणीचा समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कुणाच्याही चिथावणीला बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी लॉकडाउनबद्दलही भाष्य केलं.
ADVERTISEMENT
मुंबईतील बाल कोविड काळजी केंद्राचं आज मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील कोविड परिस्थितीबद्दल राज्य सरकारची भूमिका मांडली. तसंच नागरिकांनाही आवाहन केलं. ‘राज्यातील ऑक्सिजन साठ्यात विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला राज्यात लॉकडाउन लागू करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
‘आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवांचं लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, पण आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं सांगत त्यांनी तिसऱ्या लाटेबद्दल सुरू असलेल्या तयारीबद्दल माहिती दिली.
‘लहान मुलांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांना रुग्णलयासारखं वातावरण जाणवणार नाही, यासाठी चांगलं वातावरण असण्याच्या दृष्टीने हे सेंटर उभारले आहेत. कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. आपल्याला हे टाळायचं आहे. आपण जर नियम पाळले नाही, तर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. लॉकडाउन टाळायचा असेल, तर कुणी कितीही चिथावणी देत असेल, भडकवत असेल तरी त्यांच्या चिथावणीला दाद देउ नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.
‘आता सुद्धा मी गर्दी बघितली. ही गर्दी योग्य नाहीये. आपण सर्वांनी काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असं वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक, सामाजिक संघटनाना मी विनंती करतो; आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनयात्रा काढलेल्या भाजपला अप्रत्यक्षपणे आवाहन केलं.
ADVERTISEMENT
