Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी मदत आणि बचावकार्यही सुरू आहे. अशात चंद्रपूरमधला एक थरारक व्हीडिओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधल्या ३५ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. या बसचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस!
ट्रक आणि प्रवासी गाडी पुरात गेली वाहून
चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसी कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील ३५ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस पुढे दामटली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
Mumbai Rain: रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्र किनारी जाण्यास बंदी
बस पुराच्या पाण्यात अडकली आहे ही माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव अभियान सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून वृद्ध- लहान मुले आणि महिला यांना बाहेर काढले. या सर्वांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दरम्यान राज्यात सध्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार १३ ते १४ जुलै या कालावधीत पालघर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी पावसाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT
