वसंत मोरे, बारामती
ADVERTISEMENT
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आज (8 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते.
ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.
आज कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अलका कुबल यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यात प्रमुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे.
शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रिकरण करण्याबरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन स्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल. असे आवाहन केल्याचे कुबल यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आमदार मकरंद आबा पाटील, निखील घाडगे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता नाही-शरद पवार
दरम्यान, अलका कुबल यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे. अलका कुबल या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याची नेमकी भेट का घेतली असावी याविषयी विविध चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT












