Ketki Chitale : केतकी चितळेचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त, ठाणे पोलिसांची कारवाई

मुंबई तक

• 03:14 PM • 16 May 2022

अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketki Chitale ) लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईल (Mobile) जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) ही कारवाई केली आहे. याआधी पोलिसांनी तिच्याकडे एक मोबाईल होता तो जप्त केला होता. आता तिचा लॅपटॉप आणि आणखी एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. शरद पवारांविषयी विकृत […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketki Chitale ) लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईल (Mobile) जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Police) ही कारवाई केली आहे. याआधी पोलिसांनी तिच्याकडे एक मोबाईल होता तो जप्त केला होता. आता तिचा लॅपटॉप आणि आणखी एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

हे वाचलं का?

शरद पवारांविषयी विकृत पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला १४ मे रोजी पोलिसांनी अटक केली. त्यावेळी तिच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आज म्हणजेच अटकेनंतर दोन दिवसांनी तिचा आणखी एक मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. शरद पवारांविषयी केतकी चितळेने अत्यंत आक्षेपार्ह शब्दांमधली कविता तिच्या फेसबुकवर पोस्ट केली होती. ज्यानंतर तिला अटक करण्यात आली. ठाणे कोर्टात तिला हजर करण्यात आलं. त्यानंतर तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आज केतकी चितळेच्या नवी मुंबईतल्या घरी गेले होते. तिथे त्यांनी एक लॅपटॉप आणि एक मोबाईल असल्याचं पाहिलं जो त्यांनी जप्त केला आहे. केतकी चितळेने जी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली होती त्याखाली अॅड. नितीन भावे असं नाव लिहिलं होतं. ही कविता त्यांची आहे असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं आता हे नितीन भावे कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.

शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?

अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी कळंबोली येथून अटक केली. रात्रभर पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर पोलिसांनी केतकी चितळेला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सुनावणीअंती न्यायालयाने केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कोर्टात काय म्हणाली केतकी चितळे?

न्यायाधीश व्ही.व्ही. राव यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी ‘तुमची काही तक्रार आहे का?,’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘नाही,’ असं उत्तर केतकी चितळेने दिले.

त्यानंतर ‘तुमचे कुणी वकील आहेत का?,’ असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. त्यावर केतकी म्हणाली, ‘नाही. मी जे काही बोलले आहे, तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केलं आहे, तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे,’ असं केतकी म्हणाली.

ठाणे न्यायालयात सुनावणीवेळी केतकी चितळेने स्वतःच स्वतःचा युक्तिवाद केला. यावेळी तिने मी राजकीय व्यक्ती नसून, सामान्य व्यक्ती आहे. मी मास लीडर नाहीये की, ज्यामुळे माझ्या लिहिण्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी केलेली पोस्ट एक प्रतिक्रिया होती. ती पोस्ट स्वःखुशीने आणि मर्जीने केलेली आहे. लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य नाही का?,’ असं केतकी चितळे स्वतःचा बचाव करताना म्हणाली होती. आता पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि आणखी एक मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणात आता पुढे काय काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp