एका युवतीच्या आत्महत्येचा प्रकरणात पोलिसांनी मला क्लिन चीट दिली आहे. मी निर्दोष आहे. यापुढे माझ्यावर जर आरोप झाले तर कायदेशीर मार्गाने उत्तर देईन. जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी सरकारमध्ये मंत्री होतो. मी मंत्री असण्याचा या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. मात्र पोलिसांनी मला क्लिन चीट दिली आहे असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
संजय राठोड यांच्याबाबत चित्रा वाघ यांनी काय म्हटलं होतं?
शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित विस्तार मंगळवारी पार पडला. यावेळी संजय राठोड यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळातला समावेश दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता संजय राठोड यांनी हे वक्तव्य केलं आहे. पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने आत्महत्या केल्याचं प्रकरण गाजलं होतं. या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या प्रकरणात १८ महिन्यांनी संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे पूजा चव्हाणचं प्रकरण?
पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. 2021 च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातल्या १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यामधला आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप विरोधी पक्षाने (भाजप) केला होता. यानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या आधी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे बंजारा समाजून येतात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये केली. तरुण वयातच त्यांना यवतमाळचं शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष पद मिळालं. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात संजय राठोड यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २००४ साली झालेल्या निवडणुकीत संजय राठोड यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत पहिल्यांदा यवतमाळमध्ये भगवा फडकवला.
२००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या संजय देशमुखांना पराभवाचं पाणी पाजलं. यावेळी राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये संजय राठोड मोजक्या ५ आमदारांमध्ये होते. यानंतर आतापर्यंत संजय राठोड यवतमाळमध्ये शिवसेचेचं वर्चस्व राखून आहेत. या जोरावरच त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थानही देण्यात आलं. संजय राठोड यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री पद होतं. जे पद त्यांना सोडावं लागलं होतं आता त्यांना कोणतं खातं दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
