सातारा : येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार महेश शिंदे यांची बहिण डॉ. अरुणा बर्गे वादात सापडल्या आहेत. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा उलट आरोप अरुणा बर्गे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराचा काल (शुक्रवार) शेवटचा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणात गावोगावी राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातही ३१९ ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात प्रामुख्याने बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे.
कोरेगावचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते भिडल्याची गोष्ट ताजी असतानाच आता आमदार महेश शिंदे यांची बहिण डॉ. अरुणा बर्गे विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याची बातमी येत आहे.
अरुणा बर्गे या क्षेत्र माहुली ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार संपल्यानंतर विरोधात बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला कानाखाली लगावण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. या वेळी जमावानेही गोंधळ घालायला सुरुवात केल्यान काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या घटनेबाबत बोलताना अरुण बर्गे म्हणाल्या, प्रचारानंतर काही माणसं मला भेटली. मी त्यांच्या सोबत बोलल्यानंतर गाडीत जाऊन बसले. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली. दारू पिऊन माझ्या अंगावर धावून येऊन गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी हात वर केला. मी एकटी बघून सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या अंगावर धावून आले, असेही गंभीर आरोपही आमदार महेश शिंदे यांच्या बहिणीने केला.
ADVERTISEMENT
