मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या काल झालेल्या भेटीगाठीनंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना बावनकुळे यांनी राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे, असे म्हणत भविष्यातील भाजप-मनसे युतीचे संकेतही दिले.
ADVERTISEMENT
या भेटीनंतर सविस्तर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी सुरुवातीला ही भेट राजकीय असल्याचे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आपण राज ठाकरे यांची केवळ सदिच्छा भेट घेतली. शिवाय उद्यापासून गणेशोत्सवदेखील आहे, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात.
Ramdev Baba: ”बाळासाहेबांचे मानस, आध्यात्मिक आणि राजकीय वारसदार एकनाथ शिंदेच”
राज आणि आमचे वैचारिक साम्य : बावनकुळे
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे. ते नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडून रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणे गैर नाही. त्यामुळे आगामी काळात वैचारिक मुद्द्यावर भाजप-मनसे युतीची चर्चा होणार का या चर्चांना सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी :
यासोबतच बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे. त्यांनी सर्वकाही सोडून दिले असून कौटुंबिक प्रेमात सगळे विसरले आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला बगल देऊन ते आपले कार्य करत आहेत. सध्या त्यांचे जे काही सुरू आहे त्यावरुन ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा; सोनिया गांधींबद्दल केलेल्या ट्विटमुळे अडचणीत
युतीचा निर्णय केंद्रातून :
भाजप-मनसे युती होणार का? या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी युतीचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस घेतात. माझे, काम केवळ पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. त्यामुळे युती करणे, भविष्यात काय रणनीती असणार याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
