उन्हाच्या झळांनी कोमेजला नागपूरचा ‘अंबिया बहार’; संत्र-मोसंबीला गळती, शेतकरी चिंतेत

मुंबई तक

06 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नागपुरातील संत्री निर्यात केली जातात. डिसेंबरचा महिना सरला की साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात संत्री आणि मोसंबीची नवीन फळं धरायला सुरुवात होते. नागपुरात या मोसमाला अंबिया बहार असं म्हटलं जातं. परंतू यंदा वाढत्या उन्हामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांच्या अंबिया बहार कोमेजून गेला […]

Mumbaitak
follow google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नागपुरातील संत्री निर्यात केली जातात. डिसेंबरचा महिना सरला की साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात संत्री आणि मोसंबीची नवीन फळं धरायला सुरुवात होते. नागपुरात या मोसमाला अंबिया बहार असं म्हटलं जातं. परंतू यंदा वाढत्या उन्हामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांच्या अंबिया बहार कोमेजून गेला आहे.

वाढत्या उन्हाचा यंदा संत्राच्या पिकाला चांगलाच फटका बसताना दिसत आहे. सध्याच्या घडीला संत्र आणि मोसंबीची 80 टक्के फळं ही वाढत्या उन्हामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी संत्रं व मोसंबी ही फळपिके घेतात.

यावर्षी रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यातच आंबिया बहार बहरला. परंतू यानंतर थंडीचे प्रमाण कमी झालं आणि वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र आणि मोसंबीची फळं गळत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यासमोरचं संकट वाढलं आहे.

मागच्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कमतरता नाहीये. परंतू सध्याच्या घडीला नागपूरमधलं वातावरण 45 अंशापर्यंत गेल्यामुळे मुबलक पाणी मिळूनही फळं गळतीचं प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. यापुढेही उष्णतेचं प्रमाण कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे नागपूरमधील संत्र उत्पादक शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात १०७१२ हेक्टरमध्ये संत्रं तर ६००० हेक्टरमध्ये मोसंबीचे पिक घेतलं जातं. अंबिया बहारच्या मोसमात यंदाही चांगली फळं धरल्यामुळे शेतकरी सुखावला होता. परंतू वातावरणात झालेल्या अचानक बदलांमुळे इथला शेतकरी हवालदील झालेला पहायला मिळत आहे. फळांची होणारी गळती थांबवण्यासाठी शेतकरी अनेक उपाय करत असले तरीही त्यांना यश येताना दिसत नाहीये.

नरखेड तालुक्यातील मोवाड व खैरगाव हा संत्र उत्पादकांचा सर्वात मोठा भाग मानला जातो. या भागातील ९० टक्के शेतकरी याच फळपिकावर अवलंबून असतो. वर्षभर संत्र्याच्या पिकाची जोपासना केल्यानंतर सगळ्यात शेवटी या भागातील संत्री जानेवारी पर्यंत तुटतात, पण मात्र या वर्षी चित्र वेगळं आहे. या वर्षी वाढत्या उष्णतेमुळे संपूर्ण संत्री खाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. असं असतानाही सरकार यात कुठेही लक्ष द्यायला तयार नाही. कृषी विभागाकडून आम्हाला ना मार्गदर्शन मिळत आहे ना काही मदत अशी नाराजीची भावना येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

सरकारी मदत योग्य वेळेत मिळाली नाही तर यंदा संत्राच्या पिकावर मोठा परिणाम होईल अशी भीतीही यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

    follow whatsapp