मुंबईमध्ये पावसाने शनिवारी त्याचं रौद्ररूप काय असतं ते दाखवून दिलं. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाणीच पाणी साठल्याचं पाहण्यास मिळालं. आता मुंबईसह चार जिल्ह्यांना अतिमुसळधार इशारा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा मुंबईत पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तास हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत असं हवामान खात्याने सांगितलं हे. या 24 तासांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किमी इतका असेल असंही सांगण्यात आलं आहे. अतिमुसळधार पावसाचा इशार मुंबईत देण्यात आला आहे.
मुंबईत दुपारी चार वाजल्यापासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्येही पावसाचा जोर आहेच. याप्रमाणेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आता मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
भांडुप भागात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखील पाणी शिरलं. त्यामुळे हे पंप हाऊस आणि यंत्रसामग्री देखील बंद करावी लागली. भांडुपच्या याच जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये पाणी पुरवठा केला जातो. मात्र तो बंद झाल्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमधला पाणी पुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच पावसाच्या संततधारेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.
शनिवारी मुंबईत सर्वाधिक पाऊस
शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे 4 वाजेनंतर कमी झाला. रात्री 11 ते पहाटे 4 या साधारणपणे पाच तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे 226.82 मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.
दहीसर खालोखाल चेंबूर परिसरात 218.45 मिलिमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरात 211.08 मिलिमीटर, कांदिवली परिसरात 206.49 मिलिमीटर, मरोळ परिसरात 205.99 मिलिमीटर, बोरिवली परिसरात 202.69 मिलिमीटर, किल्ला (फोर्ट) परिसरातील महापालिका मुख्यालय येथे 201.93 मिलिमीटर आणि ‘जी दक्षिण’ विभाग परिसरात (वरळी) 200.4 मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे
ADVERTISEMENT
