Mohan Bhagwat Speech, मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘संघाचा 100 वर्षांचा प्रवास – नवी क्षितिजे’ या विषयावर महत्त्वपूर्ण सत्र पार पडले. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात रविवारी (दि.8) सकाळी 10.30 वाजता झालेल्या या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, भाजपच्या सत्तेत येण्याने संघाचे चांगले दिवस सुरु झाले का? असा सवाल यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं. मोहन भागवत यांना कोण-कोणते प्रश्न विचारण्यात आले? त्यांनी काय उत्तर दिलं जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
भाजपच्या सत्तेत येण्याने संघाचे चांगले दिवस सुरु झाले का? भाजप संघाची राजकीय शाखा आहे का? भ्रष्ट आणि तत्वहीन नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊ नये, यासाठी RSS ने दबाव टाकायला हवा का? सध्या भाजपचे संघटन मंत्री संघातून का येत नाहीत? कम्युनिष्ट पक्षाची स्थापना होऊन 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, संघाचा विस्तार झाला तसा कम्युनिष्ट पक्षाचा का झाला नाही?
मोहन भागवत उत्तर देताना म्हणाले, कम्युनिष्ट पार्टीसाठी जो प्रश्न विचारलाय, तो तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. ते आम्हाला येऊन विचारणार असतील आम्ही सांगायला तयार आहोत. भाजप सत्तेत आल्याने आमचे चांगले दिवस सुरु झाले, असं नाही. याचं उलटं आहे. आम्ही एक विचार आणि निती घेऊन चालतो, हे मी काल सांगितलं होतं. जशी जशी आमची ताकद वाढते, तसं तसं आम्ही प्रतिपादन करतो, प्रचार करतो. लोक त्याला मानू लागतात. लोकांकडून त्या नितीचा स्वीकार करण्यात आला तर निवडणुकीच्या राजकारणात त्या नितीचा स्वीकार केलेल्या लोकांना लाभ होतो. आमच्या नितीचा पुरस्कार कोणी करायचा? हे आम्ही सांगत नाहीत. ती त्यांची मर्जी असते. आम्ही राम मंदिराच्या बांधण्याच्या बाजूने उभा राहिलो. त्या भूमिकेचे त्यांना राजकीय लाभ झाला. इतर लोकांना मनाई करण्यात आली नव्हती. त्यांनी केलं नाही. आमची ताकद आहे. लोक ऐकतात आणि मानतात देखील. त्या नितीच्या बाजूने असलेल्यांचा फायदा होतो. आम्ही नितीसाठी करतो. आमचं काम वाढलं, तेव्हा त्या नितीचा पुरस्कार करणाऱ्यांना लाभ झाला. त्यांचे अच्छे दिन आले. आमचे अच्छे दिन आमच्या कष्टामुळे आले आहेत. गुरुजींच्या जन्मा शतीपासून हे सुरु झालं. तोपर्यंतची परिस्थिती लोकांनी सहन केली. त्यानंतर लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला. हे लोकं आहेत, यांचं पण ऐकलं पाहिजे. आणिबाणीमध्ये यांनी चांगलं काम केलं. राम जन्मभूमीसाठी आंदोलन केलं. घाम गाळून आणि प्रयत्न करुन आम्ही आमच्या समर्थन करणाऱ्या लोकांची संख्या वाढवली. आमचे अच्छे दिन त्यामुळे आले आहेत.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, आम्ही कोणावर दबाव टाकला नाही. आणि कोणावर दबाव टाकत देखील नाहीत. तत्त्वनिष्ठ राजकारण आणि राजकारणात निती या बाबींचा आम्ही पुरस्कर करतो. हे करणे स्वायत्त आहे. संघाची शाखा पाहायची असेल तर तुम्ही या. तुम्हाला तिथे राजकारण पाहायला मिळणार नाही. विश्व हिंदू परिषद , विद्यार्थी परिषद, किसान संघ, भारतीय जनता पार्टी यामध्ये संघाचे स्वयंसेवक आहेत. प्रभावी देखील आहेत. मात्र, या संघाच्या शाखा नाहीत. हे स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था आहेत. सल्ला पाहिजे असेल तर आम्ही सर्वांना देतो. काही संकट दिसत असेल तर त्यांना आम्ही सांगतो. क्रिया करणं त्यांचं काम आहे. घरात पाच भाऊ आहेत, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे बिझनेस आहेत. भाऊ आहेत, तर भावाप्रमाणे राहतील. याचा अर्थ तुमचा बिझनेस मी चालवेन. मी सांगतो तसं करा, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांचं पुण्य त्यांच्याजवळ आहे. त्यांचं थोड पाप आमच्यावर येतं. त्याचा काही उपाय नाही. ती आमची रिस्क आहे, आम्ही ती घेतोय. आम्हाला हे देखील माहिती आहे. राजकारणावर संघाचा दबाव नसतो. राजकारणावर दबाव मतदारांचा असतो. राजकारण वोटवादी आहे. हे दुरुस्त करायचं असेल तर हा प्रबोधनाचा विषय आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











