Maharashtra Legislative Council Election 2026 : महाराष्ट्र विधानपरिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 13 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यानुसार 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.
ADVERTISEMENT
'हे' सदस्य होणार निवृत्त
13 मे रोजी निवृत्त होणारे सदस्य हे महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदारांमार्फत निवडून गेले होते. या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
हे ही वाचा : समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?
'असा' आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे, तर अर्ज माघारीची मुदत 4 मे आहे. मतदानाची प्रक्रिया 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे. विशेष म्हणजे, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतांची मोजणी केली जाईल आणि निकाल जाहीर केला जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 13 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ही निवडणूक आमदारांच्या मतांद्वारे होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी आपली गणिते जुळवणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : इंजिनिअरिंग पास उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, लगेच अर्ज करा; 'इतका' मिळणार पगार
निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
निवृत्त होणारे सदस्य विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करत असल्याने, निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणती नवीन नावे समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 13 मे रोजी नव्या सदस्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.
ADVERTISEMENT











