नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान आज (16 एप्रिल) पहिल्याच दिवशी जोरदार वादविवाद पाहायला मिळाला. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर जोरदार चर्चा झाली. चर्चेदरम्यान सभागृहातील परिस्थिती अनेक वेळा चिघळली, ज्यामुळे थेट आरोप-प्रत्यारोप झाले. अशीच एक घटना तेव्हा घडली जेव्हा शिवसेनेचे UBT चे खासदार अरविंद सावंत विधेयकावर बोलत होते. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी ज्या भाजप नेत्यांवर महिला अत्याचारासंबंधी कारवाई झाली होती त्याचा उल्लेख केला. ज्यानंतर सभागृहात बराच वेळ वाद झाला. पण त्याचवेळी अरविंद सावंतांनी भाजपवर अत्यंत बोचऱ्या शब्दात जहरी टीका केली.
ADVERTISEMENT
अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात कुलदीप सिंह सेंगर आणि बृजभूषण शरण सिंह यांचा उल्लेख केला. ज्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुढाकार घेत थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केलं. ज्यामुळे लोकसभेतील वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान, हा वाद शांत करण्यासाठी अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला.
निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं अन् सभागृहात वातावरण तापलं
पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत बोलू लागताच चर्चेदरम्यान वातावरण तापले. पंतप्रधानांनंतर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण भाग्यवान आहोत, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर, भाषणाच्या मध्यातच त्यांनी भाजपशी संबंधित वादग्रस्त मुद्द्यांकडे मोर्चा वळवला. अध्यक्षांना उद्देशून ते म्हणाले, "कुलदीप सेंगर कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत हे आपण विसरता कामा नये. बृजभूषण शरण सिंह कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे."
हे ही वाचा>> Delimitation वरून संघर्ष, नेमका राजकीय डाव अन्... पाहा तुमच्या राज्यात काय बदलणार!
सावंत यांनी या नावांचा उल्लेख करताच सभागृहातील भाजप सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि सांगितले की संसदेत कोणावरही असे आरोप करणे योग्य नाही. दरम्यान, गदारोळ सुरू असतानाही, अरविंद सावंत आपल्या मतावर ठाम राहिले आणि त्यांनी सडेतोड टिप्पणी केली, "बलात्कारी इतके गोंडस असतात का?" या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. त्याचवेळी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले, "जर ते कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल बोलत असतील, तर आदित्य ठाकरे यांचेही नाव घेतले जाईल. त्यांनीही 'अभिनेत्री'ची हत्या केली."
हे ही वाचा>> समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?
'मी तडीपारचं नाव घेऊ का?', सावंत संतापले
निशिकांत दुबेंच्या या टिप्पणीनंतर अरविंद सावंत हे चांगलेच संतापले. ज्यानंतर ते म्हणाले की, 'कोणाला बदनाम करायचं असतं तर मी तडीपारचं नाव घेऊ का? स्वत: तडीपार होता.. एपस्टिन फाइलचं नाव घेऊ का? सांगा ना.. तोंड उघडू नका कधी.. पूर्ण करून टाकेल.. माझ्याकडे सगळं आहे तुमचं.. तुमची तर लाइन आहे महिला अत्याचारांची..' अशी जहरी टीका यावेळी सावंतांनी केली.
लोकसभा अध्यक्षांना करावी लागली मध्यस्थी
त्यानंतर, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक सुरू राहिली. पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी ही वक्तव्ये नोंदीचा भाग नसतील असे सांगून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.
ADVERTISEMENT











