अजित पवारांवर महाविकास आघाडीचे आमदार नाराज? नरमाईच्या भूमिकेवर आक्षेप

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांचं निलंबन झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती ठरली असतानाही अजित पवारांनी सभागृहात नरमाईची भूमिका घेतल्याने आमदार नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा […]

Mumbai Tak

ऋत्विक भालेकर

22 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

follow google news

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतील आमदार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांचं निलंबन झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्याची रणनीती ठरली असतानाही अजित पवारांनी सभागृहात नरमाईची भूमिका घेतल्याने आमदार नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील वातावरण तापलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजन दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची सोखल चौकशी व्हावी अशी मागणी शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांकडून सातत्याने केली जात होती. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं या प्रकरणात नाव घेण्यात आल्यानं त्यांना हा मोठा झटका मानला जात आहे.

याच मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरु असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या मुद्द्यावर सर्व विरोधक आक्रमक झालेले असताना अध्यक्ष नार्वेकरांनी मात्र त्यास नकार दिला. या सगळ्या गोंधळात जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका” असा शब्दप्रयोग केला. सत्ताधाऱ्यांकडून याच निर्लज्ज शब्दावर आक्षेप घेण्यात आला.

यानंतर जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं. अध्यक्षांविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करत सत्ताधारी पक्षांनी आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती.

    follow whatsapp