–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
राज्यात महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचाराचा मुद्दा ज्वलंत बनला असून, राज्याची उपराजधानी नागपुरात आणखी एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नागपुरातील सुराबर्डी जवळील म्हाडा क्वार्टर समोर असलेल्या मैदानात एका २३ वर्षीय तरुणीला अत्यंत क्रूरपणे पेट्रोल टाकून जाळून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
निकिता लखन चौधरी असे २३ वर्षीय तरुणीचे नाव असून, ती मंगळवारी (१५ मार्च) संध्याकाळपासून बेपत्ता होती. तिच्या आईने नागपुरातील प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, काल (१६ मार्च) संध्याकाळी निकिताचे जळालेले प्रेत वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुराबर्डी परिसरात एका मैदानात आढळून आले.
निकिता नागपुरातील खामला परिसरात एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती. मंगळवारी (१५ मार्च) कार्यालयात गेल्यानंतर ती संध्याकाळी घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या आईने प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
पोलीस तिचा शोध घेत असताना बुधवारी (१६ मार्च) संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात निकिताचे जळालेले प्रेत एका गावकऱ्याला दिसून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
विशेष म्हणजे निकिता काम करत असलेले खामला परिसरातील कार्यालय आणि तिचे जळालेले प्रेत सापडले ते सुराबर्डी परिसर बऱ्याच अंतरावर असून, तिला त्या ठिकाणी कुणी नेले याचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीप्रमाणे निकिता (१५ मार्च रोजी) खामला परिसरातील तिच्या कार्यालयातून संध्याकाळी घराकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र अनेक तास उलटूनही ती घरी न पोहोचल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला होता. ती कुठेच मिळून न आल्यामुळे रात्री प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. नंतर तिचा मृतदेहच आढळून आला.
पोलिसांनी निकिताच्या एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT
